यूपीए सरकारच्या काळातही नव्हतं इतकं पेट्रोल-डिझेल महागणार

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

कर्नाटक निवडणुकीपूर्वी असलेले मार्जिन कायम ठेवायचे असेल तर तेल कंपन्यांना पेट्रोल लिटरमागे ४.५० रुपयांनी तर डिझेल लिटरमागे ४ रुपयांनी महाग करणे अपरिहार्य आहे. त्यामुळे हा इंधन दरवाढीचा बॉम्बगोळा कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पेट्रोल नव्वदी पार करेल. डिझेलचा भावही एंशीच्या पुढे सरकेल. एवढी भाववाढ तर यूपीए सरकारच्या काळातही झाली नव्हती अशी टीका आता सोशल मीडियावर सुरू आहे.

गुरुवारी पेट्रोलचा दर प्रति लिटर ८३.१६ इतका होता. तो आज २९ पैशांनी वाढून ८३.४५ इतका झाला आहे. तर गुरुवारी डिझेलचा दर प्रति लिटर ७१.१२ इतका होता. जो आज ३० पैशांनी वाढून ७१.४२ इतका झाला आहे. कर्नाटक निवडणूक झाल्यानंतर सलग चौथ्या दिवशी ही वाढ झाली आहे.

कर्नाटक निवडणुकीची धामधूम संपताच इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल कंपन्यांनी सोमवारीच पेट्रोल व डिझेलचे दर वाढवले होते. त्यानंतर चार दिवसांत पेट्रोल ६९ पैशांनी वाढले आहे. यात आज पुन्हा २२ पैशांची वाढ झाली. गेल्या पाच वर्षांतील ही सर्वात मोठी वाढ आहे. चार दिवसांत डिझेलच्या दरात ८६ पैसे प्रतिलिटर वाढ झाली आहे. यात आज पुन्हा २२ पैशांची भर पडली. ही वाढही पाच वर्षांतील उच्चांकी आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात काल कच्च्या तेलाच्या भावात प्रचंड वाढ झाली. गुरुवारी एका बॅरलचा भाव ८० डॉलर्सच्या पुढे गेला होता. तेल कंपन्यांचे सकल विपणन मार्जिन कर्नाटक निवडणुकीपूर्वी २.७ रुपये प्रतिलिटर एवढे होते. हेच मार्जिन कायम ठेवायचे असेल तर तेल कंपन्यांना तात्काळ पेट्रोल ४.५० रुपये तर डिझेल ४ रुपयांनी महाग करणे भाग आहे.

महागाईचा भडका उडणार

इंधन दरात वाढ झाली की महागाईच्या वणव्यात तेल ओतले जाणार आहे. अगोदरच नोटाबंदी व बँकांच्या घोटाळय़ामुळे बाजाराला शैथिल्य आले आहे. त्यात इंधन दरवाढ झाल्यास पेट्रोल नव्वदी पार करेल. डिझेलचा भावही एंशीच्या पुढे सरकेल. पर्यायाने सर्वसामान्यांच्या खिशालाच कात्री लागणार आहे.