ऊसदराप्रमाणे दुधालाही भाव देणार!

27
milk-deary

सामना प्रतिनिधी । नागपूर

दूध उत्पादक शेतकऱ्यांना ऊसदराप्रमाणे या ७०:३० या सूत्राप्रमाणे दुधाचे दर मिळावे यासाठी शुगर प्राइज कंट्रोल ऍक्टच्या धर्तीवर कायदा केला जाईल. त्याचप्रमाणे दूध उत्पादक तसेच दूध संघाचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक घेऊन त्यावर या अधिवेशनातच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भुकटीचे दर कोसळल्यामुळे दूधसंघावर कोसळलेले संकट, दूधदर ठरविण्याचे अधिकार केंद्र सरकारऐवजी राज्य सरकारला असावेत यासाठी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर मुख्यमंत्री तसेच दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी आश्वासन दिले. राज्यात दुधाचे प्रतिदिन २ कोटी ८७ लाख लिटरचे उत्पादन होऊन १ कोटी २० लाख लिटरची बाजारात विक्री होते. भुकटीचे दर कोसळल्यामुळे दूध संघ अडचणीत आला असल्याची बाब या लक्षवेधीद्वारे निदर्शनास आणण्यात आली.

महानंदबाबत सरकार निर्णय घेईल
महानंद दुग्धशाळा ही संस्था तोट्य़ात असून ती बंद पडल्यास १२५० कामगार-कर्मचारी आणि २५ लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांवर संकट ओढवेल. याबाबत सरकार योग्य निर्णय घेणार का, असा प्रश्न सुनील प्रभू यांनी विचारला असता राज्य सरकार यात लक्ष घालून योग्य निर्णय घेईल असे आश्वासन राज्यमंत्र्यांनी दिले.

महासंघांविरुद्धची कारवाई दोन महिने स्थगित
राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी तीनदा भाववाढ केली. याअंतर्गत कारवाई करण्याच्या नोटिसाही दूध महासंघांना पाठविण्यात आल्या. मात्र सचिव समितीचा अहवाल येईपर्यंत दोन महिने या कारवाईला स्थगिती देण्यात येईल, असे अर्जुन खोतकर यांनी सांगितले.

कुर्ला, वरळीतील दूध डेअऱ्या बंद करण्याचा प्रस्ताव नाही
यावेळी सुनील शिंदे यांनी दूध दर राज्य सरकारकडूनच ठरवले जावेत. त्याचप्रमाणे आरेकडून सुक्षितांना दिले जाणारे स्टॉल व्यवस्थापनाने ऍक्वायर केले आहेत. ते पुन्हा सुशिक्षित तरुणांना मिळतील का तसेच कुर्ला, वरळीतील दूध डेअऱ्या बंद करण्याबाबतच्या प्रस्तावामुळे येथील कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण असल्याकडे सरकारचे लक्ष वेधले. यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिलेल्या उत्तरात दूध दर राज्य सरकारकडून ठरविले जाण्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा केला जात असून केंद्र सरकार यावर सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे कुर्ला, वरळीतील दूध डेअऱ्या बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचेही त्यांनी सांगितले.

तोटा कोण सहन करणार?
विधानसभेत दूध उत्पादकांना योग्य भाव मिळायला हवा या विषयावरून चर्चा सुरू असताना अजितदादांनी चर्चेदरम्यान अध्यक्ष महाराज, तुमच्या दूध महासंघात किती भाव आहे सांगा, असे अचानक विचारल्यावर अध्यक्षांनीही चटकन दुधाला २१ रुपये भाव देत असल्याचे सांगितले. सरकारने २७ रुपये भाव सांगितला असताना कमी भाव देत असल्याबाबत तोटा कोण सहन करणार? असा सवालही त्यांनी केला. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांची बाजू सावरून घेत अध्यक्षांच्या दालनात दूध महासंघ आणि शेतकरी या दोघांचेही हित साधण्याबाबत बैठक बोलाविण्याचे आश्वासन दिले.

आपली प्रतिक्रिया द्या