भाज्या स्वस्त, खा मस्त ; टोमॅटो, वांगी, भेंडी, गाजर, काकडी, फ्लॅावर, कोबी 10 रुपये किलो

एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने भाव गडगडले आहेत. टोमॅटो, वांगी, भेंडी, गाजर, काकडी, फ्लॉवर आणि कोबी आदी भाज्यांचा किलोचा दर थेट दहा रुपयांवर आला आहे. वाटाणा आणि शेवग्याची शेंग या भाज्या २२ ते २५ रुपये किलो या दराने विकल्या जात आहेत. मार्केटमध्ये आज सवासातशे भाजीपाल्याच्या गाड्या आल्या. हा माल विकताना व्यापाऱ्यांच्या अक्षरशः नाकीनऊ आले. दर पडल्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांची चंगळ झाली असून शेतकऱ्यांचे मात्र अतोनात नुकसान होत आहे.

एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटमध्ये सध्या महाराष्ट्रबरोबर गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथील मालाचीही मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे सर्वच भाज्यांचे दर सुमारे ३० टक्क्यांनी कमी झाले आहेत. गेल्या महिनाभरापासून मार्केटमध्ये सर्वच भाज्या कवडीमोल दराने विकल्या जात आहेत. त्यात आणखी दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांवर गाडीभाड्यासाठी पदरमोड करण्याची वेळ आली आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी वाटाणा १६० रुपये किलो या दराने विकला जात होता. मात्र आता वाटाण्याचे दर २५ रुपये किलोच्या आसपास आले आहेत. वर्षभर शेवग्याची शेंग ४० ते ४५ रुपये किलो या दराने विकली जात होती. मात्र आता ती थेट २० रुपये किलोवर आली आहे.

किरकोळ बाजारात चढे दर

एपीएमसीच्या ठोक मार्केटमध्ये भाज्या कवडीमोल दराने विकल्या जात असल्या तरी किरकोळ बाजारात त्यांचे दर पूर्वीप्रमाणेच चढे आहेत. होलसेलमध्ये १० रुपये किलोने मिळणाऱ्या भाज्यांसाठी ग्राहकांना किरकोळ बाजारामध्ये ४० ते ६० रुपये मोजावे लागत आहेत. तेल, कडधान्य, मसाले आणि कांद्याच्या दरात मात्र मोठी वाढ झाली आहे.

उष्णतेमुळे आवक वाढली

वातावरणात झालेल्या बदलाचा फटका चालू वर्षी भाजीपाल्याच्या पिकाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला थंडी होती. मात्र आता अचानक थंडी कमी होऊन तापमानामध्ये वाढ झाली आहे. उष्णता वाढल्यामुळे माल लवकर परिपक्व झाल्याने बाजारात आवक वाढली असून त्याचा परिणाम बाजारभावावर झाला आहे, अशी प्रतिक्रिया एपीएमसीचे संचालक शंकर पिंगळे यांनी व्यक्त केली आहे.

थेट पणनचा परिणाम

सरकारने एपीएमसीचे नियमन हटवून थेट पणनच्या नावाखाली शेतकऱ्यांना मुंबई शहरात आपला शेतमाल विकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे किरकोळ व्यापारी थेट शेतकऱ्यांकडून माल खरेदी करतात आणि शहरात आणून विकतात. त्यामुळे मार्केटमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली असून त्याचाही परिणाम या बाजारभावावर झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या