पंतप्रधान आणि पैठणी

147

>> शिरीष कणेकर 

‘रावणाचं आडनाव काय होतं गं?’’ वर्तमानपत्राआडून तपकिरीचा बार भरत शंकररावांनी पार्वतीकाकूंना विचारलं.
‘‘माहीत नाही; पण तुमचं आणि त्याचं एकच असावं.’’ पार्वतीकाकू हिंस्रपणे म्हणाल्या, ‘‘तोही तुमच्यासारखा दहा तोंडांनं बोलायचा व दहा नाकांनी तपकीर ओढायचा.’’

शंकररावांच्या डोक्यातून तिडीक गेली. पार्वतीकाकूंनी आपल्याला रावण म्हटलं याचा राग होताच; पण त्या ‘तुमचं आडनाव’ म्हणाल्या याचा जास्त राग होता. पंचेचाळीस वर्षे संसार केल्यावर त्या ‘तुमचं आडनाव’ म्हणत होत्या? ‘‘बरं, त्याची जात कोणती होती?’’ शंकरराव राग आवरत म्हणाले. ‘‘राक्षस. तुमचीच.’’ पुन्हा तुमचीच! पार्वतीकाकू दुष्टाव्यानं बोलत होत्या.

शंकररावांच्या मनात आलं की पुरुषाची सगळय़ात मोठी शत्रू कोण असेल तर ती म्हणजे त्याची लग्नाची बायको असं जज होवाळकर म्हणायचे ते खोटं नाही. डोक्यात झालेला विचारांचा गुंता सोडवण्यासाठी त्यांनी तपकिरीचा आणखी एक बार भरला. या खेपेला त्यांनी वर्तमानपत्राचा आडोसा केला नाही. पार्वतीकाकूंचा निःशब्द निषेध म्हणून.

सकाळपासून पार्वतीकाकूंचं डोकंच कामातून गेलं होतं. लग्नानंतर शेजारच्या बन्याबापूंनी त्यांना जेव्हा सांगितलं की शंकरराव हे मॅजिस्ट्रेट नसून कोर्टात क्लार्क आहेत तेव्हाही असंच त्यांचं डोकं गेलं होतं. क्लार्क? कारकून? म्हणजे त्या कारकुनीणबाई? सतत आरामखुर्चीत बसून तपकीर ओढणारा व तपकिरीची बोटं आरामखुर्चीच्या कापडाला पुसणारा कारकुंडा नवरा! पार्वतीकाकूंचा संताप एवढा अनावर झाला होता की त्या भरात त्यांना वाटलं की त्यांची लाडकी पैठणी जाळून टाकावी. मग त्यांनी स्वतःला आवरलं. नवरा कारकून असला तरी पैठणीनं त्यांचं काय घोडं मारलं होतं? किंबहुना पैठणीकडे बघून त्या जगू शकत होत्या. त्यातून शंकररावांनी आरामखुर्चीत बसल्या बसल्या त्यांना एक बहुमोल माहिती पुरवली होती. बन्याबापूंची बायको दूधवाल्याचा हात धरून पळून गेली होती.इतक्या वर्षांनंतर आज सकाळी बन्याबापूंनी दुसरा बाँब फोडला होता.

‘‘तुमच्या पैठणीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं बारकाईनं लक्ष आहे.’’ बन्याबापू धीरगंभीर आवाजात म्हणाले.
‘‘माझ्या पैठणीकडे?’’ पार्वतीकाकू तारस्वरात ओरडल्या,’’ पण त्यांना कळलं कसं की माझ्याकडे पैठणी आहे म्हणून? मी तर तिला ट्रंकेच्या तळाशी ठेवते व दारं खिडक्या बंद करूनच काढून बघते. बन्याबापू, तुम्ही नाही सांगितलंत ना, मोदींना?’’
‘‘छेः छेः मी कसा बोलेन?’’ बन्याबापू घाईघाईनं म्हणाले, ‘‘चुकून शंकररावांच्या तपकिरीबद्दल बोलून गेलो. त्यावर ‘मेरे देशवासियों’ असं काही तरी ते बोलले.’’ पैठणी और पती औरत के गहने है’ असंही ते म्हणाले. नंतर त्यांनी स्वतःहून आस्थेनं चौकशी केली. म्हणाले, ‘कैसी है हमारी पार्वतीजी और उनकी कुयरी डिझाईनवाली पैठणी?’ म्हणून म्हटलं की त्यांचं तुमच्या पैठणीकडे बारीक लक्ष आहे.’’

‘‘अगं बाई, हे म्हणजे भलतंच आहे.’’ पार्वतीकाकू हबकून म्हणाल्या, ‘‘नरेंद्रजींना माहित्येय म्हणजे ते अमित शहा, अरुण जेटली, सुब्रह्मण्यम स्वामी, प्रकाश जावडेकर व किरीट सोमय्या यांच्यापर्यंत जायला कितीसा वेळ लागतोय? टी. व्ही.वर खडाजंगी चर्चा होणार. माझी व माझ्या पैठणीची बाजू घेऊन स्वल्पविरामही न घेता अखंड बोलायला आता अर्णव गोस्वामीही नाही. निखिल वागळेही नाही. दीनदुबळय़ांचं तारणहार आता कोणीच नाही का? आम्ही आमची पैठणी घेऊन कुठं जायचं?’’
‘‘म्हणत असाल तर माझ्या गावी जाऊन राहू.’’ बन्याबापू ऊर्फ धूर्त कोल्हा म्हणाला. ‘‘तिघं?’’‘‘नाही, दोघंच.’’
‘‘त्यापेक्षा मी आणि ‘हे’ जातो. तुम्ही इथंच रहा व आमच्या घरावर लक्ष ठेवा.’’ पार्वतीबाईंनी अचूक तोडगा काढला, ‘‘पण मुळात ही पळापळ कशासाठी? पैठणी असणं हा काही गुन्हा नाही.’’ ‘‘लवकरच तो गुन्हा ठरणार आहे.’’ असं धक्का देणारं बोलायचं असतं तसा आवाज काढत बन्याबापू म्हणाले. त्यांचा आधीचा डाव पूर्णपणे उधळला गेला होता, ‘‘लपवलेला काळा पैसा बाहेर काढायला मोदी सरकार नरभक्षक वाघासारखे एकेक पाऊल उचलत नरडीचा घोट घ्यायला येत आहे.

देशामधील सर्व बँका व पतसंस्था यात असलेल्या लॉकर्सची अधूनमधून अचानक तपासणी केली जाईल. त्यात सापडणाऱया बेहिशेबी सोनं व रोकड रकमेचा हिशेब मागितला जाईल. तो न देऊ शकल्यास गुन्हे दाखल केले जातील. शंभरच्या नोटांचा व्यवहार आणि त्यांची बँकनिहाय आकडेवारी घेण्याचं काम सध्या चालू आहे. पुढल्या काही महिन्यांत व्यवहारातील शंभरच्या जुन्या नोटाही अचानक बंद केल्या जातील आणि त्या बदलून न देता हिशेब देऊन फक्त बँकेत जमा करता येतील. कारण काही काळय़ा पैसेवाल्यांनी पाचशे व हजारच्या नोटा बदलून तो पैसा शंभरच्या नोटांत लपवला आहे… हे विचार माझे नसून रिझर्व्ह बँकेचे निवृत्त मुख्य सचिव एन चंद्रा यांचे आहेत. चंद्रा व बन्याबापू यांच्या जॉइंट विद्वत्तेनं पार्वतीकाकू गार पडल्या.

‘‘पण माझ्या पैठणीला कसला धोका आहे?’’ त्यांनी धीर करून विचारले. ‘‘अनेकांनी जुन्या नोटा देऊन सोनं घेतलंय. त्यांच्यावर आणि त्या सोनारांवरही धाडी पडणार आहेत. बेनामी मालमत्तेवर टाच येणार आहे. यातून कोणी सुटणार नाही. तुमच्या घरातले लॉकरही उघडले जातील.’’ बन्याबापू म्हणाले. ‘‘पण माझ्या पैठणीचं काय?’’ पार्वतीकाकूंनी कापऱया आवाजात विचारलं. ‘‘तीही मोदींच्या ‘अजेंडा’वर आहे’’ बन्याबापू धीरगंभीर आवाजात म्हणाले. जणू ते फाशीची शिक्षा सांगणारे जज होवाळकर होते, ‘‘मोदींची खास माणसं येवल्याला रवाना झालीत. कोणी कोणाला केवढय़ाला पैठणी विकली याचा तपशील ते गोळा करतायत. कुठल्याही क्षणी तुमच्या दारावर टक् टक् होईल…’’तोच दारावर टक् टक् झालं. बन्याबापू चपापले. पार्वतीकाकू गर्भगळीत झाल्या. शंकरराव आत आले. बन्याबापू बाहेर पडले. पार्वतीकाकूंनी बन्याबापूंबरोबरचा संवाद इत्थंभूत सांगितला. सांगतानाही त्या व त्यांचा आवाज कापत होता.

‘‘सोपं आहे.’’ शंकरराव तपकिरीची डबी शोधत प्रसन्नपणे म्हणाले, ‘‘तुझ्या पैठणीचे आपण हात हातभर तुकडे करू. एक स्वयंपाकघरात बोळा म्हणून, एक फर्निचरवरची धूळ झटकायला म्हणून, एक माझी तपकिरीची बोटं पुसायला म्हणून अशी विल्हेवाट लावून टाकू. सगळा पुरावाच नष्ट होईल. पुराव्याशिवाय केस उभीच राहू शकत नाही. दॅटस् ऑल माय लॉर्ड. आय रेस्ट माय केस हिअर…’’
शंकरराव कारकून असले तरी काही काळ ते बॅरिस्टर सेटलवाडांकडे होते ये मत भूलो.
> [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या