पंतप्रधान नरेंद्र मोदी G-7 देशांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी फ्रान्सला रवाना

500

पंतप्रधान नरेंद्र मोदी बहारीनच्या दौऱ्याहून G-7 देशांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी फ्रान्सला रवाना होत आहेत. G-7 देशांचे 45 वे शिखर संमेलन 24 ते 26 ऑगस्ट दरम्यान फ्रान्सच्या बेलारित्झमध्ये होत आहे. G-7 देशांसह युरोपीय संघाचे प्रतिनिधीही या समेलनात सहभागी होणार आहेत. या संमेलनात पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार असून कश्मीर मुद्द्यावर या नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

बहारीनमध्ये श्रीनाथजी मंदिरात पूजा अर्चना केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सला रवाना झाले आहेत.या परिषदेत G-7 म्हणजे फ्रान्स, जर्मनी, यूके, इटली, अमेरिका, कॅनडा आणि जपान या देशांसह युरोपीय संघाचे प्रतिनिधीही सहभागी आहेत. या परिषदेसाठी फ्रान्सने हिंदुस्थानला विशेष आंमत्रित केले आहे. या परिषेदेत अॅमेझॉन जंगलातील आग, बेक्झिटमुळे निर्माण झालेली समस्या, व्यापार संघर्ष यासह अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे. अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्धाचे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहेत. तसेच जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट आहे. त्यामुळे या मुद्द्यांवर परिषदेत चर्चा होणार असल्याने जगाचे लक्ष या परिषदेकडे लागले आहे.

या महत्वाच्या बैठकीपूर्वी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युएल मैकाँ यांनी जनतेला संबोधित केले. या बैठकीत अॅमेझॉन जंगलांना लागणारी आग हा विषय प्रामुख्याने चर्चेला घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमची घरे जाळण्यात येत असताना आम्ही शांत बसणार नाही, असे ते म्हणाले. वातावरणातील बदलांवरील चर्चाही महत्वाची आहे. पर्यावरणातील जंगल आणि समुद्र आपल्याला संरक्षणासाठी साद घालत आहेत. त्यामुळे आता फक्त चर्चा करण्यापेक्षा ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. व्यापार युद्ध आणि जागतिक मंदी रोखण्यासाठी या बैठकीत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच कश्मीर मुद्द्यावरही चर्चा होणार असल्याचे हिंदुस्थानसाठीही ही बैठक महत्त्वापूर्ण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या