
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘बीकेसी’मधील सभेसाठी गर्दी जमवताना ‘मिंधे’ गट आणि भाजप कार्यकर्त्यांच्या नाकीनऊ येत असल्यामुळे गर्दी जमवण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनाही जुंपल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या सभेत ‘पंतप्रधान स्वनिधी फेरीवाला कर्ज योजने’ची सुरुवात होणार आहे. यासाठी तब्बल एक लाख फेरीवाल्यांना दहा हजारांचे कर्ज देण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. यासाठी प्रत्येक वॉर्डातून 200 फेरीवाले आणण्याचे टार्गेट लायसन्स अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे आधीच कर्ज घेण्यासाठी वणवण करणारे अधिकारी फेरीवाल्यांना जमवण्याचे कामही करणार आहेत.
फेरीवाल्यांना दहा हजारांचे कर्ज देण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून कार्यवाही करण्याचे निर्देश पालिकेला देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ‘फेरीवाला’ लायसन्स नसले तरी व्यवसायाच्या ठिकाणी पाहणी करून कर्ज देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे काम पालिकेवर सोपवण्यात आले होते. विविध बँकांच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार आहे. यानुसार पालिकेने केलेल्या कार्यवाहीत 1 लाख 16 हजार फेरीवाल्यांनी आपले अर्ज पालिकेकडे सादर केले आहेत. यातील एक लाखाहून अधिक फेरीवाल्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये फेरीवाल्यांना पहिल्यांदा दहा हजारांचे कर्ज देण्यात येणार आहे. हे कर्ज फेडल्यास 20 हजार आणि हे कर्ज फेडल्यास 50 हजारांचे कर्ज देण्यात येणार आहे.
मिंधे गटाकडून भाडय़ाच्या कार्यकर्त्यांची जमवाजमव
मोदींच्या सभेसाठी गर्दी जमवण्यासाठी पदाधिकाऱ्यांना भाडय़ाचे कार्यकर्ते जमवण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या ’तात्पुरत्या’ कार्यकर्त्यांना ने-आण, खाणे-पिणे आणि भत्ताही देण्याचे आश्वासन देऊन ठाणे-मुंबईतून गर्दी जमवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे कळते. सभेसाठी किमान एक लाख कार्यकर्ते जमवण्याचे टार्गेट दिल्याने कार्यकर्त्यांकडून जोरदार जमवाजमव सुरू असल्याचे समजते.