महिला सक्षमीकरण आणि ‘लाडकी बहीण’ योजनेच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शनिवारी ठाण्यात येत असून त्यांची जाहीर सभाही होणार आहे. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या आज ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत मोदींना 20 रोकडे सवाल करण्यात आले आहेत. महिलांवरील वाढते अत्याचार, टेंडर घोटाळे, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या यासारख्या अनेक मुद्दय़ांवर स्वतःला विश्वगुरू म्हणवणारे मोदी उद्याच्या सभेत एक शब्द तरी बोलणार आहेत काय, या मुद्दय़ांवर त्यांच्यात उत्तर देण्याची हिंमत आहे काय, असे आव्हानच इंडिया आघाडीने दिले आहे.
ठाण्याच्या घोडबंदर भागातील बोरिवडे येथे होणाऱ्या सभेसाठी गेल्या आठ दिवसांपासून सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीच्या पदाधिकारी व नेत्यांनी खास पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांवर असंख्य प्रश्नांची सरबत्ती केली. राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्याच्या स्थानिक प्रश्नांसह राज्य व देश पातळीवरील विविध प्रश्नांना वाचा पह्डली. बदलापूरमधील दोन चिमुकलींवर नराधमाने केलेल्या अत्याचारापासून भूमिपुत्रांच्या प्रश्नापर्यंत अनेक विषय त्यांनी परखडपणे मांडले.
आव्हाड यांनी राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारचा समाचार घेतला. ते म्हणाले, एकीकडे तिजोरी पूर्णपणे रिकामी झाली असतानाही फक्त विविध प्रकल्पांच्या घोषणा करण्यात आल्या असून ठेकेदार आणि पदाधिकाऱ्यांच्या सोयीकरिता करोडो रुपयांच्या निविदा काढण्यात येत आहेत. विशेष म्हणजे प्रकल्पाचा कंत्राटदार आधी ठरवला जातो आणि नंतर प्रत्यक्षात कंत्राट काढले जाते, असा गंभीर आरोपही आव्हाड यांनी केला. या पत्रकार परिषदेस शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुहास देसाई, काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण आदी उपस्थित होते.
काही परखड प्रश्न
z भ्रष्ट युतीच्या भ्रष्टाचाराची जबाबदारी तुम्ही कधी घेणार? छत्रपती शिवाजी महाराजांच्या उज्ज्वल परंपरेला धक्का बसला आहे. हा खोलवर पसरलेला भ्रष्टाचार केवळ माफी मागून मिटेल का?
z तुमच्या डबल इंजिन सरकारने महाराष्ट्राला महिलांवरील गुह्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आणले आहे. दररोज 20 बलात्कार घडत आहेत. तुमच्या सरकारमध्ये ‘लाडकी बहीण’ सुरक्षित का नाही?
z 20 हजार 762 प्रकरणांसह मुलांवरील गुह्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. बदलापूरसारख्या घटनांमध्ये तुमचे सरकार दुर्लक्ष करत आहे. महाराष्ट्रात मुले खरंच सुरक्षित आहेत का?
z वेदांत-फॉक्सकॉन, टाटा एअरबस आणि बल्क ड्रगसारख्या मोठय़ा प्रकल्पांना राज्याबाहेर का घेऊन गेलात? सात लाख कोटींचा तोटा आणि चार लाख भूमिपुत्रांच्या नोकऱ्या गेल्याबद्दल तुम्ही उत्तर कधी देणार?
z महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच सर्व 27 महापालिका निवडून न आलेल्या प्रशासकांच्या ताब्यात आहेत. तुमच्या सरकारने निवडणूक न घेऊन लोकशाहीचा गळा का घोटला?
z महायुतीच्या नेत्यांकडून स्थानिक गावकऱ्यांच्या जमिनीवर अवैध कब्जा केला जातोय. त्यांच्यावर ईडी, सीबीआयची चौकशी का लागत नाही?
z मुख्यमंत्री ठाणे जिह्याचे असून महिलाविरोधी गुह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे याबद्दल तुम्ही का बोलत नाही?
z नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यास महाविकास आघाडीच्या सरकारने मान्यता दिली होती. तरी आता केंद्र सरकार का टाळाटाळ करीत आहे?