संसद भवनाच्या उद्घाटनावेळी 75 रुपयांचे नाणे जारी होणार

नवीन संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी 75 रुपयांचं नाणं जारी करण्यात येणार आहे. 28 मे रोजी होणाऱ्या या समारंभात हे नाणं जारी करण्यात येईल. या नाण्यावर नवीन संसद भवनाचं चित्र असेल. त्याखाली 2023 हे त्या नाण्याचं जारी झालेलं वर्षंही कोरण्यात आलं आहे. त्यावर हिंदीत संसद संकुल आणि इंग्रजीत पार्लमेंट कॉम्प्लेक्स असे शब्द कोरलेले असतील. त्यावर अशोक चिन्हही अंकित केलेलं असेल.

या नाण्याचं वजन 35 ग्रॅम इतकं असेल. त्यात 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे आणि 5-5 टक्के निकेल आणि झिंक धातूचं मिश्रण असेल. त्याचा व्यास 44 मिमी इतका असेल तर नाण्याच्या कडेवर 200 सेरेशन असतील. या नाण्याचं डिझाईन संविधानाच्या पहिल्या अनुसूचित नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार करण्यात आलं आहे.

उद्धाटन सोहळा हा यज्ञ आणि पूजेने सुरू होईल. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा कक्षाचं औपचारिक उद्घाटन करणार आहेत. यावेळी शैव संप्रदायाचे महायाजक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेन्गोल हा राजदंड सोपवतील. या राजदंडाला नवीन संसद भवनात लोकसभा अध्यक्षाच्या आसनाजवळ स्थापित करण्यात येईल.