जीवनविद्या मिशनचे तत्त्वज्ञान

98

कांचन नितीन पालव

जीवनविद्या मिशनतर्फे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली  पुण्यस्मरण महोत्सवाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष 28 आणि 29 जानेवारी रोजी कामगार क्रीडा भवन, एल्फिन्स्टन रोड, मुंबई येथे साजरे होत आहे. त्यानिमित्त

गेली साठ वर्षे जीवनविद्या मिशनचे हे कार्य अविरतपणे चालू आहे. सद्गुरू वामनराव पै. एक द्रष्टे व्यक्तिमत्त्व, आधुनिक तत्त्ववेत्ते सर्वसामान्यांसारखे राहूनही त्यांनी एक स्वप्न उराशी बाळगले. सर्व मानवजात सुखी झाली पाहिजे व आपला देश सर्वार्थाने पुढे जावा, या दोन उदात्त हेतूंनी वामनराव पै यांनी ठिकठिकाणी प्रबोधन केले. सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनात आपल्याला हवे तसे बदल घडवून आणता येतात, त्याचे शास्त्र्ा त्यांनी अखिल मानवजातीला बहाल केले. जीवन विद्येचे हे तत्त्वज्ञान विज्ञानाधिष्ठत आहे. म्हणूनच त्याचा पसारा वाढत गेला. साठ वर्षांपूर्वी नाम संप्रदाय मंडळ या नावाने लावलेले या रोपटय़ाचे रूपांतर आज भव्य अशा वटवृक्षात झालेले आहे. सुरुवातीचा काळ म्हणजे 1952 चा. आपण कल्पना करू शकतो. या काळात एखादी संस्था चालविणे किती जिकिरीचे काम असेल. परंतु सुरुवातीच्या पहिल्या नामधारकांच्या फळीने वामनराव पै यांना अक्षरशः उचलून धरले. त्यांच्याकडून अनेक ग्रंथांची निर्मिती करवून घेतली. 1952 पासून ते 2012 म्हणजे वयाच्या नव्वदीपर्यंत जीवनविद्या तत्त्वज्ञान समाजात रुजविण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. गेल्या 60 वर्षांच्या कालावधीमध्ये मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमध्ये तीसहून अधिक पुस्तकांचे लिखाण गेले आहे. देशात-परदेशात जीवनविद्येवर आधारित 10 हजारांपेक्षा अधिक व्याख्याने दिली. गेल्या 10 वर्षांपासून दर रविवारी सकाळी 8 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर व्याख्यान अखंड सुरू आहे. ‘चिंतन हा चिंतामणी’ या कार्यक्रमाचा आकाशवाणीवर सलग 10 वर्षे प्रसारणाचा विक्रम झाला आहे. संपूर्ण राज्यामध्ये गोवा व अमेरिकेमध्ये ‘बालसंस्कार केंद्र’, ‘उत्कर्ष विद्यार्थ्यांचा, संकल्प जीवनविद्येचा’ या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना विनामूल्य मार्गदर्शन. ‘कृषी समृद्धी’, ‘किसान जागृती अभियान’ या अभियानांतर्गत अन्य संस्थांच्या सहकार्याने शेतकऱयांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी कार्य सुरू आहे. पोलीस आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गासाठी तणावमुक्त जीवन या विषयावर कार्यशाळा घेतल्या जातात. या मिशनची धुरा आता त्यांचे पुत्र प्रल्हाद हे सांभाळत आहेत. त्यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांपासून तरुणांपर्यंत अनेक कोर्सेस जीवनविद्या मिशनने सुरू केले. आधुनिक जीवन प्रवाहाबरोबर जीवनविद्या मिशननेही कात टाकली असली तरी जुने महोत्सव आजही साजरे केले जात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या