ठाण्यात पीएनबी बँकेवर ‘ईडी’ची छापा

सामना प्रतिनिधी । ठाणे

नीरव मोदी याच्या ठाण्यातील शॉपर्स स्टॉप व जिली डायमंड शॉपवर ‘ईडी’ने दोन वेळा छापेमारी केल्यानंतर नौपाडा येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेवरही धाड टाकली. या धाडीत बॉण्ड, जमा रक्कम, दागिने जप्त केल्यानंतर दुकानांची खाती गोठवण्यात आली. दरम्यान जप्त केलेला ऐवज सुमारे दहा कोटी रुपयांचा असल्याचे समजते.

ठाण्यातील विवियाना मॉलमध्येही नीरव मोदीचे शॉपर्स स्टॉप व जिली डायमंड शॉप आहे. या दोन्ही ठिकाणी दोन दिवसांपूर्वी ईडीच्या पथकाने छापे टाकून सील ठोकले होते. त्यानंतर सोमवारी पुन्हा या दोन्ही शॉपवर तब्बल दोन वेळा छापे घालण्यात आले. यावेळी मोठय़ा प्रमाणावर दागिन्यांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला, तर नौपाडा येथील खारकर आळी येथे असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेतही धाड टाकण्यात आली. या सर्व ठिकाणांहून जप्त केलेल्या ऐवजांचे मूल्यांकन झाले असून त्याची माहिती देण्यास अधिकाऱयांनी नकार दिला आहे. मात्र सील केलेल्या मालमत्तेची किंमत आठ ते दहा कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी तलावपाळी येथील राजवंत ज्वेलर्सवरही ईडीच्या पथकाने सोमवारी धाड टाकली.

आपली प्रतिक्रिया द्या