मतदान कुणाला केले? पावती मिळणार! राज्य निवडणूक आयोग घेणार निर्णय

54

सामना ऑनलाईन, मुंबई
ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचे आरोप झाल्यानंतर मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाने पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता महापालिका, नगरपालिका निवडणुकांत व्होटर व्हेरिफायल पेपर ऑडिट (मतदानाची पावती) बाहेर पडणारे मतदान यंत्र वापरण्यात येणार आहे. यामुळे आपण ज्या उमेदवाराला मतदान केले त्यालाच मत गेले का, हे कळणार आहे. याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग घेणार असल्याचे निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले.

मान्यताप्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आज विशेष बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक आयुक्तांनी ही माहिती दिली. सचिव शेखर चन्ने यांच्यासह विविध पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीच्या प्रतिनिधींनी यावेळी मतदान केल्याची पावती दर्शविणाऱ्या यंत्रांचे उपस्थित प्रतिनिधींना प्रात्यक्षिक दाखविले.’

बहुसदस्यीय निवडणुकांसाठी यंत्रात बदल
मतदानाच्या अचूकतेची पाकती दर्शविणाऱ्या यंत्रामुळे कोणाला मतदान केले याची मतदाराला खात्री करता येते. निवडणूक आयोगाने देशात काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर या यंत्राचा वापर सुरू केला आहे. त्याच धर्तीवर राज्य निवडणूक आयोग विचार करीत आहे, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होतात. त्या अनुषंगाने या यंत्रात बदल करण्यासंदर्भात इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीला कळविण्यात आले होते. त्यांनी आवश्यकतेनुसार प्राथमिक स्वरूपात हे यंत्र तयार केले आहे. त्याचेच प्रात्यक्षिक आज दाखविण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या