पृथ्वी शॉ पुनरागमनासाठी सज्ज होतोय, 16 नोव्हेंबरला बंदी उठणार

मुंबईकर कसोटीपटू आणि युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉवरील 8 महिन्याची बंदी येत्या 16 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे याच काळात खेळलेल्या जाणाऱ्या सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबई संघात पृथ्वीच्या नावाचा विचार होऊ शकतो असे संकेत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ( एमसीए ) ऍडहॉक निवड समितीचे अध्यक्ष मिलिंद रेगे यांनी दिले आहेत. पृथ्वीने अजाणतेपणे घेतलेल्या कफ सिरपमध्ये ‘टर्बुटेलाइन’हे प्रतिबंधित द्रव्य आढळल्याने आंतरराष्ट्रीय अँटी डोपिंग नियमानुसार त्याच्यावर 15 मार्च 2019 पासून 8 महिन्यांची तात्पुरती बंदी लादण्यात आली होती. मुंबई संघातून पृथ्वी क्रिकेट मैदानातील आपले पुनरागमन साजरे करू शकतो.

9 नोव्हेंबरला आपला वाढदिवस साजरा करणाऱ्या पृथ्वीसाठी एमसीए निवड समितीकडून दिलासादायक न्यूज मिळाली आहे. कारण अद्याप सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबई संघाची निवड घोषित झालेली नाही.त्यामुळे निवड समिती मुंबई संघातील निवडीसाठी पृथ्वीच्या नावाचा विचार करणार असे संकेत आहेत.कारण पृथ्वीसारख्या धडाकेबाज फलंदाजांची संघाला आवश्यकता आहे. अजाणतेपणे सर्दीचे औषध तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेण्याची मोठी किंमत पृथ्वीला मोजावी लागली आहे. त्याने आपली चूक तात्काळ मान्य केल्याने क्रिकेट बोर्डानेही त्याच्यावर कठोर कारवाई केली नाही.पृथ्वीने पदार्पणीय कसोटीत शतक झळकावण्याचा पराक्रम साकारण्यासोबतच बंदी लागू होईपर्यंत 2 कसोटींत 237 धावांची नोंद केली आहे.

पहिल्या 6 लढतींत पृथ्वीला संधी नाही
सय्यद मुश्ताक अली चषक क्रिकेट स्पर्धेच्या गट फेरीतील पहिल्या 6 लढतींत पृथ्वी शॉला संधी मिळणार नाही कारण तोपर्यंत त्याच्यावरील बंदी संपलेली नसेल .मात्र या फेरीतील अखेरच्या 7व्या लढतीसाठी त्याच्या नावाचा अवश्य विचार करू असे मिलिंद रेगे म्हणाले.अर्थात या निवडीत पृथ्वीला हमखास मुंबई संघात संधी मिळण्याबाबत ठोस आश्वासन मात्र रेगे यांनी दिले नाही. पुढच्या फेरीत मात्र हरहुन्नरी पृथ्वीला मुंबई संघात नक्कीच संधी मिळेल अशी अशा मुंबईकर क्रिकेट शौकिनांना आहे.

आपली प्रतिक्रिया द्या