हा अघोषित आणीबाणी आणायचा प्रयत्न आहे! राहुल गांधी यांच्यावरील कारवाईवर पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

prithviraj-chavan

मानहानी खटल्यात सूरत न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवल्यानंतर शुक्रवारी त्यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं. त्यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभेने ही कारवाई केली असली तरी यातला कर्ता-करवता कोण, हे सूरत न्यायालयाच्या निकालावेळीच कळलं होतं, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेला मोदी किती घाबरलेत हे दिसून येत असून हा अघोषित आणीबाणी आणण्याचा प्रयत्न आहे, असं टीकास्त्र त्यांनी सोडलं आहे.

राहुल गांधी यांना मिळालेल्या शिक्षेवर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आज लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घोषित केला आहे. सूरत कोर्टामध्ये 2018-19 च्या निवडणूक प्रचाराच्या वेळेला राहुल गांधींनी एका प्रचारसभेत केलेल्या वक्तव्यावर हा मानहानी खटला चालू होता. त्या खटल्याचा निकाल सूरत कोर्टाने दिला होता, त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. पण, गुन्हा सिद्ध झाला आहे, त्याला अजूनपर्यंत स्थगिती मिळालेली नाही. त्यामुळे लोकसभेने कारवाई केली आहे. पण, यातला कर्ता-करवता कोण आहे, हे सूरत कोर्टाचा निकाल आल्यावेळीच कळलं होतं. साध्या मानहानी खटल्यासाठी दोन वर्षांची शिक्षा देण्याचं कारण असं होतं की, खासदारकी किंवा संसद सदस्यत्व रद्द करण्यासाठी किमान दोन वर्षांची शिक्षा घोषित होणं आवश्यक असतं. ही शिक्षा घोषित केली तेव्हा सरकारच्या डोक्यात काहीतरी वेगळं चाललेलं आहे, याची आम्हाला कल्पना आली होती, असं चव्हाण यावेळी म्हणाले.

राहुल गांधी यांच्यावरील कारवाईविषयी बोलताने ते म्हणाले की, या कारवाईचा मी निषेध करतो. हे सुडाचं राजकारण आहे. मोदी राहुल गांधींना किती घाबरलेत हे यावरून दिसत आहे. मोदी हे राहुल गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेला घाबरले आहेत. ही अघोषित आणीबाणी आणायचा प्रयत्न आहे. महागाई, बेरोजगारीमुळे मोदींची अप्रियता वाढायला लागली आहे. त्यात काँग्रेस आणि राहुल गांधींना मिळालेली लोकप्रियता पाहाता राहुल गांधी यांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न केला आहे. शिक्षेला स्थगिती दिली असली तरी वरच्या न्यायालयात अपील करावं लागेल. त्यामध्ये काय होईल हे माहिती नाही, मात्र एकीकडे त्यांना शिक्षा करून 2 वर्ष तुरुंगात डांबून ठेवायचं . दुसऱ्या बाजूला त्यांची खासदारकी रद्द करायची आणि राहुल गांधींचा आवाज बंद करण्याचा हा धूर्त प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.