वॉटर टँकरच्या संपामुळे खासगी आणि सरकारी बांधकामे ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतल्या वॉटर टँकरचालक आणि मालकांनी पुकारलेल्या संपाचा सर्वात मोठा फटका मुंबईतील खासगी आणि शासकीय बांधकाम प्रकल्पांना बसला आहे. कोस्टल रोडपासून म्हाडा आणि रस्त्यांच्या बांधकामांना पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे बहुतांश बांधकामे बंद ठेवावी लागली होती.

केंद्र सरकारच्या नवीन नियमाच्या निषेधार्थ मुंबईतल्या टँकरचालकांनी रविवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. विहिरी आणि बोअरवेलमधून पाण्याचा उपसा करण्यापूर्वी केंद्रीय भूजल प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची सक्ती केली आहे. याविरोधात आणि अन्य काही नवीन अटींच्या विरोधात टँकरचालक संपावर गेले आहेत.
या संपावर तोडगा काढण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी टँकरचालकांच्या संघटनेसोबत बैठक आयोजित केली होती. टँकरचालकांना जिल्हाधिकारी कार्यालयाने नोटीस बजावल्या आहेत. या नोटीस मागे घेण्याची मागणी मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली, पण नोटीस मागे घेणे माझ्या हातात नाही असे उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले. तुम्ही तुमच्या मागण्यांचे पत्र मला द्या. आपण संपावर मार्ग काढू असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. नोटीस मागे घेण्याचे अधिकार तुम्हाला नाही तर मग तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करा. कारण नोटीस मागे घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर घेतले जातील अशी भूमिका टँकर संघटनेने घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे उद्या (मंगळवारी) आम्ही त्यांना पत्र देऊ, मात्र आमचा संप उद्याही सुरूच राहील असे मुंबई टँकर असोसिएशनचे अध्यक्ष जसबिर सिंग बिरा यांनी सांगितले. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावल्याचे आम्हाला समजले असल्याचे बिरा म्हणाले.

मुख्यमंत्र्यासोबत बैठकीची शक्यता
मुंबईकरांचे हाल
या संपाचा मुंबईकरांवर मोठा विपरित परिणाम झाल्याचे जसबिर सिंग बिरा म्हणाले. मुंबईत सध्या पाण्याचा अपुरा पुरवठा होत आहे. त्यामुळे अनेक गृहनिर्माण संस्था-सोसायट्या, मोठ्या वसाहती या पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहतात. टँकर बंद असल्याने या सोसायट्यांना पाण्याचा पुरवठा झाला नाही.
३२०० टँकर धावले नाहीत मुंबईत दररोज सुमारे ३ हजार २०० पाण्याचे टँकर पाणीपुरवठा करतात. टँकरच्या पाण्यावर सिमेंटचे रेडी मिक्स प्लँट, रस्त्यांची बांधकामांना, उद्यानांना टँकरच्या पाण्याचा पुरवठा होतो. कोस्टल रोड, म्हाडाचे प्रकल्पाचे बांधकामही टँकरच्या पाण्यावर चालतात. हॉस्पिटल, हॉटेल, रेल्वे यार्डना टँकरच्या पाण्याचा पुरवठा होतो. या सर्व संस्थांचा पाणीपुरवठा आज बंद होता.