500 फूट खोल दरीत कोसळलेली बस चक्काचूर, 33 प्रवाशांचा मृत्यू; 37 जखमी

सामना ऑनलाईन । कुल्लू

हिमाचल प्रदेशच्या कुल्लू येथे भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेली एक बस 500 फूट दरीमध्ये कोसळून झालेल्या अपघातात 33 लोकांनी जीव गमावला आहे, तर 37 लोक गंभीर जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी बंजार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुल्लूवरून गाडागुशैनीकडे जाताना बसला अपघात झाला आहे.

कुल्लू जिल्ह्यातील बंजारुपासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भियोठ वळणावर नियंत्रण सुटल्याने बस 500 फूट दरीमध्ये कोसळली. बसमध्ये जवळपास 40 ते 50 प्रवाशी होते. दरीत कोसळल्याने बसचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

अपघातामध्ये 33 लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 37 लोकांना गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात यश आले आहे. यात 12 महिला, 6 मुली, 7 लहान मुलं आणि 10 तरुणांचा समावेश आहे. सर्व जखमींनी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये बंजार स्कूल आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याचे वृत्त आहे.