खासगी बसची डंपरला धडक, डिझेलची टाकी फुटून डंपरने घेतला पेट; एकाचा मृत्यू

530

खासगी बस व डंपरच्या अपघातात एका मजुराचा होरपळून मृत्यू झाला, तर बसमधील चालकासह आठ प्रवासी जखमी झाले. ही घटना नगर-संभाजीनगर महामार्गावरील प्रवरासंगम येथे रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील सिद्धेश्वर मंदिरासमोर नगरकडून संभाजीनगरकडे जाणारी खासगी बस (क्रमांक जी.जे.-14, झेड- 8585) आणि डंपरमध्ये धडक झाली. अपघातानंतर डिझेल टाकी फुटून डंपरने पेट घेतला. यात होरपळून पांडुरंग रामकिसन गायकवाड (वय 27, रा. प्रवरासंगम, ता.नेवासा) याचा मृत्यू झाला. तर डंपर चालक अशोक शिंदे, ट्रॅव्हल्स चालक मोहन थावरा राठोड (रा.वडहुळी, ता.जिंतूर, जि.परभणी), संतोष धोंगडे व इतर सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भारत दाते, पोलीस नाईक बबन तमनर व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या