आता काही दिवस प्रदर्शनची ‘हवा येणार’

6

सामना ऑनलाईन, मुंबई

झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ चं सूत्रसंचालन गेली तीन निलेश साबळे करत होता. त्याच्याजागी आता प्रियदर्शन जाधव सूत्रसंचालन करताना बघायला मिळणार आहे. निलेशची तब्येत बरी नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढचे काही आठवडे आता निलेशच्या जागी प्रियदर्शनच चला हवा येऊ द्यामध्ये बघायला मिळेल.

nilesh-sable

महाराष्ट्राचा सुपरस्टारमधून पुढे आलेल्या निलेशने ‘फू बाई फू’ या कार्यक्रमाच्या विविध पर्वांचे निवेदन केलं होतं. विनोदी प्रहसनांचं लेखन करत तो  ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांसमोर आला. या  कार्यक्रमाने मनोरंजनाची व्याख्याच बदलून टाकली. मराठी नाटक आणि चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठीचं हे हक्काचं व्यासपीठ बनलं. दर आठवड्याला थुकरटवाडीचे हे कलाकार येतात आणि प्रेक्षकांना खळखळून हसवतात. हा सिलसिला गेल्या तीन वर्षांपासून अखंड सुरु आहे. मुंबईतील स्टुडिओत चित्रीत होणारा हा कार्यक्रम महाराष्ट्र दौ-यानिमित्ताने विविध शहरांमध्ये गेला आणि गावागावांतील प्रेक्षकांची मने जिंकून घेण्यात यशस्वीही ठरला. या लोकप्रियतेची चर्चा अगदी बॉलिवुडमध्येही गेली आणि तेथील दिग्गज कलाकारांनीही या कार्यक्रमात हजेरी लावत आपल्या चित्रपटांची प्रसिद्धी केली. या सर्व लोकप्रियतेमध्ये निलेशचा सिंहाचा वाटा  राहीला आहे. त्याने या कार्यक्रमाचं निवेदन, लेखन आणि दिग्दर्शन अशा तीनही जबाबदा-या यशस्वीपणे पार पाडल्या. हे सर्व करत असताना मागच्या काही दिवसांपासून निलेशची तब्येत बिघडली. डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र ही विश्रांती थोड्याच दिवसांची असून लवकरच तो या कार्यक्रमात पुन्हा हजेरी लावेल असं झी मराठीतर्फे सांगण्यात आलंय.