तुझ्यासारखी बायको कोणालाही मिळू नये! अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

अमेझॉनवरील मालिका फॅमिली मॅन-2 मुळे दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणी ही पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. या मालिकेतील कामाबद्दल अभिनेता मनोज वाजपेयी, शारीब हाश्मी, शरद केळकर यांच्यासोबतच प्रियामणी हिचंही प्रचंड कौतुक केलं जात आहे. या मालिकेमध्ये प्रियामणी हिने सुचित्रा अय्यर उर्फ सुची हे पात्र रंगवलं होतं. चित्रविचित्र बहाणे सांगणारा नवरा, मुलांची देखभाल, घर सांभाळणे यामुळे वैतागलेल्या गृहिणीची भूमिका प्रियामणीने साकारली होती. पुन्हा कामावर जायची ओढ लागलेल्या सुचीच्या आयुष्यात अरविंदच्या येण्याने वादळ निर्माण झालेलं असतं असं या मालिकेत दाखवण्यात आलं आहे.

या मालिकेनंतर प्रियामणीने पोस्ट केलेल्या जवळपास सगळ्या इन्स्टाग्राम पोस्टवर लोकांनी तिला टोचायला सुरुवात केली. ‘तू श्रीकांतसोबत चांगलं नाही केलं’, ‘अरविंदसाठी तू असं केलंस ?”लोणावळ्यात काय झालं होतं?’, ‘श्रीकांतला धोका का दिलास ?’ अशा प्रतिक्रिया तिच्या प्रत्येक इन्स्टाग्राम पोस्टवर पाहायला मिळतायत. प्रियामणीने एका मुलाखतीमध्ये सांगितलं की तिला एक प्रतिक्रिया अशीही आली होती की ‘देवाने दोन ऐवजी एक चपाती दिली तरी चालेल, मात्र तुझ्यासारखी त्याने कोणालाही देऊ नये’ बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत ही प्रतिक्रिया वाचून दाखवताना प्रियामणी खळखळून हसली. अशा प्रतिक्रिया ही एकप्रकारे तुमच्या अभिनयाचं झालेलं कौतुकच आहे असं तिचं म्हणणं आहे.

प्रियामणीने म्हटलंय की अनेकदा लोकं रिल आणि रिअल याच्यातला फरक विसरून जातात. ‘मी जे पडद्यावर वागते तो माझ्या कामाचा एक भाग आहे, मी तशी प्रत्यक्ष आयुष्यात नाहीये’ हे लोकांना कळत नाही असं तिने म्हटलंय. प्रियामणी ही फॅमिली मॅनच्या दुसऱ्या सीझनला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादाबद्दल खूश आहे. या मालिकेच्या पहिल्या सीझनमध्ये सुची (प्रियामणी) आणि अरविंद (शरद केळकर) हे लोणावळ्याला कामाच्या निमित्ताने जातात असं दाखवलंय. मात्र लोणावळ्यात दोघांत काय घडलं, हे दाखवणं जाणीवपूर्वक टाळण्यात आलं आहे. यामुळे मालिकेचे 2 सीझन आले तरी अनेकांना उत्सुकता आहे की ‘लोणावळ्यात काय घडलं होतं’

आपली प्रतिक्रिया द्या