उत्तर प्रदेशात पोलीस सूडभावनेने काम करत आहे – प्रियंका गांधी

354

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेऊन योगी सरकारवर टीका केली आहे. उत्तर प्रदेशात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबतच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, असे प्रियंका गांधी यांनी सांगितले. हा कोणत्याही एका व्यक्तीच्या सुरक्षेचा मुद्दा नसून राज्याच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बदला’ घेण्याच्या वक्तव्यानुसार राज्यातील पोलीस सूडभावनेने काम करत असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला.

राज्य सरकार, प्रशासन आणि पोलिसांमुळेच राज्यात हिंसाचार पसरल्याचा आरोपही प्रियंका गांधी यांनी केला. सरकारने घेतलेल्या निर्णयांना न्याय आणि कायद्याचा कोणताही आधार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी आंदोलन दडपण्यासाठी बळाचा गैरवापर केला. त्यामुळे याची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन राज्यपालांकडे पाठवल्याचेही प्रियंका गांधी यांनी सांगितले.

आपण बिजनौरमधील अनेकांना भेटलो असून त्यांचे दुःख आणि त्यांच्यावर झालेल्या अन्याय जवळून पाहिल्याचे प्रियंका गांधी म्हणाल्या. आंबेडकरवादी असलेल्या 77 वर्षांचे निवृत्त सनदी अधिकारी दारापुरी यांनी घरातूनच अटक करण्यात आली. त्यांनी सीएए निदर्शनांबाबत फेसबुक पोस्ट टाकली होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांच्या दडपशाहीच्या अशा अनेक घटना असल्याचे त्यांनी सांगितले. अनेकांना कोणत्याही कारणाशिवाय अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आम्ही बदला घेऊ, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानुसारच पोलीस सूडभावनेने काम करत असल्याचे प्रियंका गांधी म्हणाल्या.

भगवान राम आणि श्रीकृष्ण करुणेचे प्रतीक आहेत. आपल्या संस्कृतीत ‘बदला’ घेण्याची भावना नाही. मुख्यमंत्री भगवी वस्त्रे परिधान करतात. मात्र, हा भगवा तुमचा नाही. हा भगवा रंग हिंदुस्थानच्या धार्मिक आस्थेचे प्रतीक आहे. योगी यांनी याची जाण ठेवत धर्माचे पालन करावे, असे आवाहनही प्रियंका यांनी केले. उत्तर प्रदेशात नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करताना अनेक ठिकाणी हिंसाचार उफाळला होता. त्यात आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. सीएएवरून काँग्रेस भाजपवर हल्ला चढवत आहे. आता प्रियंका गांधी यांनी पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत योगी सरकारवर टीका केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या