28 वर्षांत जिंकता न आलेलं लखनौ प्रियंका गांधींनी पहिल्या रोड शोसाठी का निवडलं?

219
priyanka gandhi congress lucknow

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बहीण आणि पक्षाच्या सरचिटणीस म्हणून निवड झालेल्या प्रियंका गांधी-वढेरा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर उत्तर प्रदेश ढवळून काढण्यास सुरुवात केली आहे. ज्याची सुरुवात त्या आज ‘लखनौ’तील रोड शो ने होणार आहे. पण गेल्या 28 वर्षांत न जिंकता आलेलं लखनौचं प्रियंका गांधी यांनी का निवडलं अशी चर्चा सध्या रंगली आहे.

vijayalakshmi-pandit-nehruनेहरू घराण्याचा लखनौमध्ये होता प्रभाव

गांधी परिवार म्हंटलं की अमेठी-रायबरेली डोळ्यासमोर येतं. पण कधीकाळी नेहरू घराण्याचं लखनौमध्ये वर्चस्व होतं. हा तेव्हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. लखनौमधून पहिली निवडणूक शिवराजवती नेहरू या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. ज्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी मात दिली होती. शिवराजवती नेहरू या पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या चुलत वहिनी होत्या. त्यानंतर दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत नेहरूंची बहीण विजयालक्ष्मी पंडित निवडून आल्या होत्या. त्यानंतरच्या पुढल्या तीन निवडणुका या शीला कौल यांनी जिंकल्या होत्या. ज्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मामी होत्या.

91 मध्ये अटलजींनी दिली मातatal-bihari-vajpayee-luckno

पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पराभूत झाल्यानंतर देखील अटलजींनी हार मानली नाही. 1991 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला तगडी मात देत लखनौ जिंकलं. त्यानंतर सगल 2004 पर्यंत ते लखनौहून खासदार म्हणून जिंकत आले. तीन वेळा देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर लालजी टंडन यांनी त्यांची परंपरा चालवली आणि 2014 मध्ये राजनाथ सिंह यांनी लोकसभा निवडणूक जिंकली. त्यामुळे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानलं जाणारं लखनौ हे भाजपच्या हातात गेलं.

काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर

लखनौ मतदारसंघात काँग्रेस 28 वर्षात जिंकून आले नसली तरी अनेकदा दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. तसेच कडवी झूंज देखील दिली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील अन्य मतदारसंघात काँग्रेसची झाली तेवढी हानी लखनौमध्ये झाली नाही हे सरळ आहे.

आता पुन्हा एकदा काँग्रेसने या मतदारसंघावर जोर देण्याचा निश्चय केला आहे. प्रियंका गांधी-वढेरा यांना मैदानात उतरवताना त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेत सगळ्यात महत्वाचा, प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा मतदारसंघ जिंकण्यासाठी काँग्रेसने कसून मेहनत सुरू केली आहे. लखनौ ज्यांचं त्याचं उत्तर प्रदेश आणि देशातही त्या पक्षाची सत्ता येण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच 2014 मध्ये सध्याचे पंतप्रधान आणि तत्कालिन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे लखनौमधून निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. तशी चाचपणी देखील करण्यात आल्याचे वृत्त तेव्हा छापून आले होते. मात्र त्यानंतर त्यांनी वारणसी निवडले. पण लखनौचे महत्व अजूनही कायम आहे.

rita-bahuguna-joshi

लखनौची जातीय समीकरणं देखील काँग्रेससाठी महत्वाची ठरतील असा त्यांच्या पक्षातील लोकांना विश्वास वाटत आहे. लखनौमध्ये मुस्लीम आणि ब्राह्मण मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असल्याचे बोलले जात आहे. गेल्या निवडणुकीत राजनाथ सिंह यांनी सहज मते घेतली असली तरी रीता बहुगुणा जोशी यांना 3 लाख मते मिळाली होती. लोकसभेसाठी हा आकडा देखील छोटा नाही. त्यानंतर 20 ऑक्टोबर 2016 मध्ये रीता बहुगुणा जोशी यांनी काँग्रेसला टाटा करत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र याच जागेसाठी अधिक नियोजनद्ध जोर लावल्यास सत्तेची समीकरणं आपण बदलू शकतो असा विश्वास काँग्रेसला आहे. त्यामुळेच प्रियंका गांधी-वढेरा यांनी पहिल्या रोड शोसाठी लखनौची निवड केल्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या