अखेर 23 वर्षांनी प्रियांका गांधींनी सरकारी बंगला केला खाली, ‘इथे’ असणार आता मुक्काम

1527

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांनी दिल्लीतील आपला सरकारी बंगला खाली केला आहे. 23 वर्षांपासून त्याचा मुक्काम लोधी इस्टेटमधील या सरकारी बंगल्यात होता. सरकारने त्यांना 1 ऑगस्टपर्यंत बांगला खाली करण्याची मुदत दिली होती, मात्र त्यापूर्वीच त्यांनी बंगला खाली केला. आता त्यांचा मुक्काम गुरुग्राम येथे असणार असल्याचे वृत्त आहे.

प्रियांका गांधी यांना सरकारी बंगला खाली करण्यासाठी 1 ऑगस्ट 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. दिलेल्या मुदतीनंतरही सरकारी बंगल्यात राहिल्यास भाडे किंवा दंड भरावा लागेल, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले होते. सपीजी सुरक्षा हटवण्यात आल्याने बंगला खाली करावा, असे कारण नोटीसमध्ये देण्यात आले होते. सरकारच्या या निर्णयाला काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी विरोध केला, मात्र आता मुदतीपूर्वी त्यांनी बंगला खाली केला आहे.

दिल्लीतील लोधी इस्टेटमधील सरकारी बंगला खाली केल्यानंतर आता त्यांचा मुक्काम गुरुग्राम येथील सेक्टर 42 मधील घरात असणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रियांका गांधी गेल्या 23 वर्षांपासून लोधी इस्टेटमधील बंगल्यात राहात होत्या. तसेच बंगला खाली करताना त्यांनी भिंतीवर पांढरा रंगही दिला आहे. बंगला खाली केल्यानंतर ज्या पेंटिंग आणि भिंतीचित्र हटवण्यात आली त्यामुळे भिंत खराब दिसू नये यासाठी हा रंग देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या