वडिलांची अंत्ययात्रा सुरू असताना… प्रियंका गांधी यांनी सांगितला भावूक प्रसंग

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेसने देशभरात संकल्प सत्याग्रह सुरू केला आहे. या आंदोलनादरम्यान बोलताना काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव व राहुल गांधी यांची बहिण प्रियंका गांधी यांनी 32 वर्षांपूर्वीचा एक प्रसंग सांगितला आहे. प्रियंका गांधी यांनी भावनिक होत त्यांच्या वडिलांच्या अंत्ययात्रेतील एक प्रसंग सांगितला आहे.

”“माझे वडील राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर 1991 मध्ये माझ्या वडिलांच्या पार्थिवाची अंत्यायात्रा तीन मूर्ती भवन या ठिकाणाहून निघाली होती. त्यावेळी आई मी आणि राहुल आम्ही एका गाडीमध्ये बसलो होतो. वडिलांचे पार्थिव लष्कराच्या ट्रकमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. थोडंसं पुढे गेल्यानंतर राहुलने खाली उतरायचे आहे असे आईला सांगितले. सुरक्षेचा प्रश्न असल्याने आईने नकार दिला. पण राहुल ऐकला नाही तो उतरला व वडिलांच्या अंत्ययात्रेसोबत चालला. काही अंतरावरच त्याने आमच्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. राहुल गाडीमधून उतरून वडिलांच्या अंत्ययात्रेत गेला होता. मला आजही ते दृश्य आठवतं. माझ्या वडिलांचं पार्थिव तिरंग्यात लपेटलेलं आलं होतं. त्या अंत्ययात्रेच्या मागे मागे चालत राहुल राजघाटपर्यंत आला होता. देशासाठी शहीद झालेल्या माझ्या वडिलांचा अपमान संसदेत करण्यात येतो. एका शहीद वडिलांच्या मुलाला देशाच्या संसदेत देशद्रोही म्हटलं जातं, मीर जाफर म्हटलं जातं. एवढंच नाही त्या माझ्या आईचाही अपमान केला जातो. मोदी सरकारमध्ये बसलेले मंत्री माझ्या आईचा (सोनिया गांधी) अपमान करतात. एका मंत्र्याने तर असं वक्तव्य केलं होतं की राहुल गांधींना हेही ठाऊक नाही की त्यांचे वडील कोण आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत म्हणाले होते की नेहरुंचा अ भिमान वाटतो तर ते आडनाव का स्वीकारलं नाही? त्यावेळी पंतप्रधान मोदींवर तर कुठलाच खटला भरला गेला नाही, त्यांचं सदस्यत्वही रद्द झालं नाही.” असं प्रियंका गांधी यांनी सांगितलं.