तुमच्यासारख्या भित्र्या, सत्तालोभी हुकुमशहा समोर झुकणार नाही, प्रियंका गांधींनी नरेंद्र मोदींना सुनावले

अब्रुनुकसानीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोषी ठरवल्यानंतर सूरत सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. या प्रकरणामुळे राहुल गांधी यांचे संसदेतील सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर त्यांची बहिण व काँग्रसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी यांनी त्यावरून भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फटकारले आहे.

प्रियंका गांधी यांनी ट्विटच्या मालिकांमधून भाजपवर ताशेरे ओढले. ”तुमच्या काही चमच्यांनी शहीद पंतप्रधानांच्या मुलाला देशद्रोही, मीर जाफर म्हटले. आपल्या मुख्यमंत्र्यांनी तर राहुल गांधी याचे वडील कोण आहेत असा प्रश्न केला होता. कश्मीरी पंडितांच्या परंपरेनुसार वडिलांच्या मृत्युनंतर मुलगा त्यांची पगडी घालतो. आपल्या कुटुंबाची परंपरा कायम राखतो. संसदेत सर्वां देखत माझ्या संपूर्ण कुटुंबाचा व कश्मीरी पंडितांचा अपमान करत विचारलं होतं की तुम्ही नेहरू नाव का नाही लावत. त्यासाठी तुम्हाला कोणत्या न्यायाधीशाने दोन वर्षांची शिक्षा नव्हती सुनावली. तुम्हाला संसदेतून निलंबीत नव्हते करण्यात आले. राहुलस गांध हे एक सच्चे देशभक्त आहेत त्यामुळे त्यांनी अडाणीच्या लूटीवर प्रश्न केले. नीरव मोदी व मेहुल चोक्सीवर प्रश्न विचारले. तुमचा मित्र गौतम अडाणी हा देशाच्या संसदेपेक्षा व देशातील जनतेपेक्षा मोठा झाला आहे का जे तुम्ही त्याच्याबद्दल प्रश्न विचारल्यावर इतके अस्वस्थ झालात? तुम्ही माझ्या कुटुंबाच्या घराणेशाहीवर बोलता. पण हे लक्षात ठेवा की या कुटुंबाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं रक्त सांडलं आहे. ज्याला तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करत आहात. या कुटुंबाने हिंदुस्थानच्या जनतेचा आवाज बुलंद केला आहे. त्यांच्या अनेक पिढ्या ही सत्याची लढाई लढत आहेत. आमच्या धमन्यांमध्ये जे रक्त आहे त्याची एक वैशिष्ट्यआहे. तुमच्यासारख्या भित्र्या, सत्तालोभी हुकुमशहा समोर कधी झुकले नाही आणि कधीच झुकणार नाही. तुम्ही काहीही करा”, असे प्रियंका गांधी यांनी ट्विट केले आहे.

याट्विट सोबतच त्यांनी नीरव मोदी, ललित मोदी व मेहुल चोक्सी यांच्या घोटाळ्यांचे आकडे टाकत भाजप भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालते का? असा सवाल केला आहे. ” नीरव मोदी घोटाळा – 14,000 कोटी, ललित मोदी घोटाळा – 425 कोटी, मेहुल चोक्सी घोटाळा – 13,500 कोटी, देशाचा पैसा लुटणाऱ्यांच्या मदतीला भाजप का उतरला आहे? ती चौकशीपासून का पळत आहे? यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात.
भाजप भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालते का?” असा सवाल केला आहे.