प्रियंकांची एन्ट्री दमदार, पण ‘या’ 5 आव्हानांचा कसा करणार सामना?

38
priyanka-gandhi-up

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या लखनौ दौऱ्यावर असून येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले आहे. प्रियंका गांधी यांच्या आगमनामुळे नवसंजीवनी मिळालेले काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते मरगळ झटकून जोमाने कामाला लागले आहेत. लखनौमध्ये प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांची रॅली तब्बल 15 किलोमीटरपर्यंत दिसून आल्याने गर्दीचा अंदाज येऊ शकतो. परंतु प्रियंकांची राजकीय एन्ट्री दमदार झाली असली तर यूपीमध्ये त्यांच्यासमोर मोठी आव्हानं आहेत. ही आव्हानं नेमकी कोणती आहेत पाहूया …

कमकुवत संघटना
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेससमोर कमकुवत संघटनेचे मोठे आव्हान आहे. 1989 मध्ये सत्ता हातातून गेल्यानंतर स्थानिक पक्षांनी जोर पकडला आणि काँग्रेस कमकुवत होत गेली. अनेक कार्यकर्ते पक्षापासून दूर गेले. काही ठिकाणी जिल्हा काँग्रेस समिती फक्त कागदावर असून अनेकवेळा सरकारविरोधात आंदोलनातही काँग्रेसचा अभाव दिसून आल्याने येथील लोकांच्या डोक्यातून पंजाचे निशाण धुरकट झाले आहे.

मोठ्या नेत्यांचा अभाव
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठ्या नेत्यांची कमी भासत आहे. बदलत्या परिस्थितीशी न जुळवून घेतल्याने येथे भाजपने बालेकिल्ला स्थापन केला. येथे बऱ्याच काळापासून राजकीय खेळी खेळलेले जगदंबिका पाल आणि रिटा बहुगुणा जोशी यासरख्या नेत्यांनी भाजपचा हात पकडला आहे. तसेच सोनिया गांधीचे राजकीय क्षेत्र राजबरेलीमध्येही काँग्रेसची परिस्थिती बिकट असून गेल्या तीन वर्षात आमदार राकेश प्रताप सिंह यांच्यासह जिल्हा पंचायत अध्यक्ष देखील काँग्रेसला रामराम करून गेले. सध्या काँग्रेसकडे माजी गृह राज्यमंत्री आरपीएन सिंह यांच्याव्यतिरिक्त मोठा चेहरा नाही. तर अखिलेश प्रताप हे फक्त टीव्हीवरील चर्चेत दिसतात. त्यामुळे येथे प्रियंकांना मोठा गोतावळा जमवून सत्तेसाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील.

पूर्वांचलचा किल्ला
प्रियंका गांधी यांच्याकडे ज्या पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे, तो आजही भाजपचा बालेकिल्ला आहे. या भागातील काशी आणि गोरखपूर या दोन मोठ्या शहरांमध्ये भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्याचे काम कठीण असणार आहे. पंतप्रधान मोदी काशी तर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाख गोरखपूरमध्ये पाय रोवून उभे आहेत. येथील लोकसभा जागांसाठी मोठी टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडे तेवढा वेळही नाही. तसेच अमेठी आणि राजबरेलीमध्येही प्रियंकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

वोट बँक
यूपीमध्ये प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचा मतदान टक्का कमी होत गेला. कधी दलितांचे तर कधी मुसलमानांच्या हक्कांचे राजकारण करणारी काँग्रेस आपला मतदार गमावून बसली आहे. येथील दलितांनी काँग्रेसला खो देऊन बसपाचा हात पकडला आहे, तर मुसलमानांचा पाठिंबा सपाकडे झुकला आहे. लोकसभेपूर्वी सपा आणि बसपाची आघाडी झाल्याने काँग्रेसला मोठे आव्हान मिळाले आहे. तसेच येथे सवर्णांची मते भाजपच्या पोतडीत असल्याने काँग्रेस कोणाच्या जिवावर यूपी जिंकण्याचे स्वप्न पाहात आहे, हे देखील प्रियंकांना स्पष्ट करावे लागेल.

विजयी चेहरे
काँग्रेसमध्ये मजबूत इच्छाशक्ती आणि जिंकवून देणाऱ्या उमेदवारांच्या कमतरतेशी झुंजावे लागत आहे. येथे उमेदवार निवडताना प्रियंकांना मोठी डोकेफोड करावी लागणार आहे. दलबदलू नेता आणि जुने कार्यकर्ते यांच्यात एकसंघपणा साधून प्रियंकांना मिशन यूपीची सुरुवात करावी लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या