सोनभद्र हत्याकांड : उत्तर प्रदेशात राजकीय गरमागरमी, प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

84
priyanka-gandhi-detained

सामना प्रतिनिधी । वाराणसी

उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिह्यातील हत्याकांड प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी या प्रकरणातील जखमींची शुक्रवारी सकाळी वाराणसीत जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्या हिंसाचारात बळी गेलेल्यांच्या पीडितांना सोनभद्र येथे भेटण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यामुळे संतप्त झालेल्या प्रियंका गांधी यांनी पोलिसांच्या कारवाईविरोधात कार्यकर्त्यांसह रस्त्यावरच ठिय्या मारला.

सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून करण्यात आलेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला. पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी यांचा ताफा जात असताना नारायणपूर येथे पोलिसांनी त्यांना रोखले. त्यावेळी त्यांनी आम्ही फक्त पीडित कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. माझ्यासोबत फक्त चार जण असतील असेही सांगितले होते, मात्र पोलीस प्रशासनाने आम्हाला त्या ठिकाणी जाऊ दिले नाही. कुणाच्या तरी दबावामुळेच आपल्याला रोखण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.  तुम्हाला काय करायचे आहे ते करा, मी आता झुकणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे.

दरम्यान, पोलीस अधिकाऱयांनी प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आलेली नाही, तर कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोनभद्र या ठिकाणी कलम 144 अर्थात जमाकबंदीसंदर्भातले कलमही लागू करण्यात आले आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी यज्ञदत्त भारतीय यांच्यासह 29 लोकांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दोषींवर  कारवाई होईल  – योगी आदित्यनाथ

सोनभद्र हत्याकांडात जे दोषी आढळतील त्यांच्याकिरोधात कठोर कारकाई केली जाईल. तसेच याप्रकरणी सिंगल बॅरल गन, डबल बॅरल गन, रायफल हे सगळे जप्त करण्यात आल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

भाजपच्या राज्यात असुरक्षितता वाढतेय – राहुल गांधी

आदिवासी कुटुंबातील लोकांनी जमीन खाली करण्यास नकार दिला म्हणून त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यावरून उत्तर प्रदेशातील भाजपच्या राज्यात असुरक्षितता वाढत असल्याचे दिसून येत आहे. सोनभद्र हत्याकांडातील पीडितांची भेट घेण्यास जाणाऱया प्रियंका यांना ज्या प्रकारे अटक करण्यात आली ते निषेधार्ह असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या