‘क्या बकवास है?’ राहुल गांधींच्या नागरिकत्वाच्या वादावर प्रियंका गांधींची प्रतिक्रिया

66

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाच्या वादामध्ये त्यांची बहिण प्रियंका गांधी-वढेरा यांनी उडी घेतली आहे. मंगळवारी या प्रकरणी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. प्रियंका गांधी म्हणतात, ‘क्या बकवास है? संपूर्ण देशाला माहिती आहे की राहुल गांधी हिंदुस्थानचे नागरीक आहेत. लोकांनी त्यांना याच देशामध्ये लहानाचे मोठे होताना पाहिले आहे.’

भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधी हे हिंदुस्थानचे नागरीक नसून ते इंग्लंडचे नागरीक असल्याचा आक्षेप घेत गृहमंत्रालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनवरून नागरीक विभागाचे संचालक बी.सी.जोशी यांनी राहुल गांधी यांना ही नोटीस पाठवली आहे.“राहुल गांधी यांचे नाव एका ब्रिटीश कंपनीच्या कागदपत्रांमध्ये सापडले असून या कागदपत्रांमध्ये राहुल गांधी हे ब्रिटीश नागरीक असल्याची तक्रार मिळाली आहे, या तक्रारीवर राहुल गांधी यांनी अधिक खुलासा करावा”, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. राहुल गांधी यांना उत्तर देण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

याआधी अमेठी मदतदारसंघातून निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार ध्रुव लाल कौशल यांनी सर्वात पहिल्यांदा राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाविषयी आक्षेप उपस्थित केला होता. राहुल गांधी यांचे नाव राऊल विंची असून त्यांच्याकडे ब्रिटनचे नागरिकत्व असल्याचा दावा त्यांनी केला होता. राहुल गांधी यांनी खोटे नाव सांगून आणि खोटे नागरिकत्व दाखवून निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचं ध्रुव लाल यांचे म्हणणे होते. या अर्जावर जिल्हाधिकाऱ्यासमोर सुनावणी झाली होती मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी ध्रुव लाल यांचे आक्षेप फेटाळून लावले होते.

आपली प्रतिक्रिया द्या