तेज तर्रार…

>> स्वरा सावंत

कल्याणचा प्रियांश पातोडे… वय वर्षे अवघं साडेचार… पण प्रियांशची बुद्धी मात्र तेजतर्रार… एवढ्य़ाशा वयात हा चिमुरडा शंभरहून अधिक गाड्य़ा आणि त्यांचे लोगो ओळखतो. अगदी हिंदुस्थान पलीकडचेही. हा छंदच नाही तर एक ध्यास आहे जागतिक विक्रम करण्याचा. जाणून घेऊया त्याच्या या आगळ्य़ावेगळ्य़ा छंदाविषयी….

हा घास काऊचा… हा घास चिऊचा घेण्याच्या वयात प्रियांशने जेवताना खिडकीत बसून रस्त्यावरून जाणारी प्रत्येक गाडी न्याहाळली आणि त्याप्रमाणेच प्रियांशची आवड कशात आहे हे त्याची आई प्रियांका यांनी हेरले. ही गाडी कोणती? दोन बसचा रंग वेगळा क़ा ? कोणती कंपनी, कोणता लोगो, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती प्रियांश करू लागला. यावेळी त्याचा प्रत्येक प्रश्न आणि त्या प्रश्नाचं प्रियांश समाधानी होईल असं उत्तर देण्याची जबाबदारी प्रियांका -सतीश यांनी उचलली. एकत्र कुटुंबात राहताना घरातला प्रत्येकजण प्रियांशचा छंद जोपासत होता. सुरुवातीला रस्त्यावर बघितलेली कार, बस किंवा अगदी जेसीबीही मोबाईलवर कसा दिसतो. यासाठी प्रियांश हट्ट करू लागला. यावर त्याच्या आईने त्याला आवडलेली कार किंवा इतर गाड्य़ांचे फोटोही डाऊनलोड करायला सुरुवात केली. काही दिवसांनंतर या गाड्य़ांचे मॉडेल्स घरी येऊ लागले. यामुळे त्याचा छंद परिवारातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात पिंगा घालू लागला. जेसीबी हे वाहन त्याच्या खूप आवडीचे. यापासून सुरू करत प्रियांश अशा शंभरहून अधिक गाड्य़ा, त्यांची कंपनी आणि त्या गाडीचा लोगो अगदी बिनचूक ओळखतो. पातोडे कुटुंबात एकूण १६ जण आहेत. मात्र प्रियांशच्या मागे घरातला प्रत्येकजण अगदी खंबीरपणे उभा आहे.

दहाव्या मजल्यावरील घरातून २०० मीटर लांब असणाऱ्या रस्त्यावरची गाडी प्रियांश ओळखतो. याबाबत त्याची स्मरणशक्ती किती आहे हे जाणून घेण्यासाठी प्रियांका पातोडे यांनी समोरच्या गाडीचे चुकीचे नाव घेऊन त्याला त्याचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न केल्याचे त्या सांगतात. यावर अगदी हट्टाने प्रियांशने ती गाडी बरोबर ओळखून घरातल्यांना पहिला धक्का दिला. त्यावेळी तो अडीच वर्षांचा होता. यानंतर आम्ही त्याचे हे कार प्रेम मनावर घेतले आणि प्रियांशला यावर भविष्यातही चांगले मार्गदर्शन देऊन पुढे नेण्याचे काम पातोडे कुटुंबीय करेल, असे सतीश पातोडे यांनी सांगितले.

तयारी गिनीज रेकॉर्डची
आतापर्यंत एका मिनिटात ५० कार ओळखण्याचा पाच वर्षाच्या मुलाचा गिनीज रेकॉर्ड आहे. प्रियांश सध्या एका मिनिटात ४५ कार आणि लोगो ओळखतो. या रेकॉर्डला लवकरच प्रियांश चॅलेंज करणार असून याची तयारी त्याचे आई-बाबा करून घेत आहेत. यासाठी गुगल गुरूंची मदत घेत असून त्याच्या मूडनुसार त्याच्याकडून ही तयारी करावी लागत असल्याचे प्रियांका पातोडे यांनी सांगितले.