व्हायरल गर्ल प्रियाची प्रसिद्धी आणि आईवडिलांना डोकेदुखी

26

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंटरनेटवर आपल्या हावभावांनी तुफान लोकप्रिय झालेल्या प्रिया प्रकाश वारियर हिच्या कुटुंबीयांना त्याच लोकप्रियतेचा त्रास होऊ लागल्याने तिला हॉस्टेलवर पाठवण्यात येणार आहे. एका इंग्रजी वेबसाईटला तिची आई प्रिथा हिने ही माहिती दिली असून प्रियाच्या प्रसिद्धीचा कुटुंबाला त्रास होत असल्याचं प्रिथा यांचं म्हणणं आहे.

या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियाने चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत कोणतीही मुलाखत देऊ नये, असं चित्रपटाच्या दिग्दर्शकाला वाटत आहे. सध्या चित्रपटाची काहीच दृश्यं चित्रीत करण्यात आली आहेत. पण, अचानक मिळालेल्या प्रसिद्धीचा त्रास होऊ लागल्याने चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यत्यय येऊ नये, म्हणून प्रियाला हॉस्टेलवर पाठवण्यात येणार आहे, असं तिच्या आईचं म्हणणं आहे. प्रियाचं हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर इतकं प्रसिद्ध होईल, असं आम्हाला वाटलं नव्हतं. घराच्या भोवती जमणाऱ्या चाहत्यांमुळे आम्हाला थोडा त्रास होत आहे. पण, कोणतीही नकारात्मक प्रतिक्रिया देण्यापेक्षा तिला इथून दुसरीकडे पाठवणं श्रेयस्कर होईल, असंही प्रिथा यांचं म्हणणं आहे.

उरू अदार लव्ह या आपल्या आगामी चित्रपटातल्या गाण्यामुळे प्रिया एका रात्रीत सुपरस्टार बनली. तिच्या चेहऱ्यावरच्या हावभावांनी आतापर्यंत अनेक तरुणांना घायाळ केलं असून तिला आता नॅशनल क्रश अशी पदवीही तिच्या चाहत्यांनी बहाल केली आहे. आईवडिलांची प्रतिक्रिया काहीही असली तरी प्रिया मात्र तिच्या प्रसिद्धीमुळे खूश आहे. तिने ट्विटरद्वारे आपल्या मृगनयनांचा जलवा पेश करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या