प्रा. रंगनाथ पठारे यांचा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार

ज्येष्ठ साहित्यिक, लेखक व समीक्षक प्रा. रंगनाथ पठारे यांना महाराष्ट्र शासनाच्या मराठी विभागामार्फत दिला जाणारा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कार मिळाला. यानिमित्त महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रा.रंगनाथ पठारे यांचा सपत्नीक सत्कार केला.

संगमनेर येथील प्रा. रंगनाथ पठारे यांच्या रथ या निवासस्थानी जाऊन सिंधुताई पठारे व प्रा. रंगनाथ पठारे यांचा बाळासाहेब थोरात यांनी सत्कार केला. यावेळी प्रा. पठारे यांनी सातपाटील कुलवृत्तांत ही प्रख्यात कादंबरी त्यांना सस्नेह भेट दिली. या भेटीप्रसंगी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व प्राध्यापक रंगनाथ पठारे यांनी सद्यस्थिती, साहित्य याचबरोबर विविध विषयांवर चर्चा केली. तसेच महाराष्ट्रातील माणसाचा पूर्व इतिहास, विविध ऐतिहासिक लढाया, ऐतिहासिक प्रसंग, यावरही चर्चा झाली. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. डॉ. सुधीर तांबे यांनीही प्रा. रंगनाथ पठारे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा या पुरस्काराबद्दल सत्कार केला आहे.

यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, प्रा. रंगनाथ पठारे हे अहमदनगर जिल्ह्यासाठी भूषणावह आहेत. त्यांनी दु:खाचे श्वापद, सातपाटील कुलवृत्तांत यांसह 13 कादंबरी, 7 कथासंग्रह, 8 समीक्षा आणि विविध विषयांवरील अनुवाद लेखन, असे साहित्यकृतीत मोठे योगदान दिले आहे.

‘दु:खाचे श्वापद’ या त्यांच्या कादंबरीचा कन्नड भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. त्यांच्या ‘ताम्रपट’ या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांची नुकतीच प्रसिद्ध झालेली ‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही कादंबरी लोकप्रिय आहे.

यावेळी प्रा. पठारे म्हणाले की, मला मिळालेला विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार हा सर्व साहित्यिक आणि लेखक यांचा प्रतिनिधी म्हणून स्विकारत आहोत. यावेळी पठारे परिवाराच्या वतीने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात औक्षण करून स्वागत करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या