गाशा गुंडाळा आता!

34

सामना ऑनलाईन, मुंबई

नाणार प्रकल्पाच्या भूमिअधिग्रहणाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणारमध्ये केली. त्यानंतर आज उद्योग विभागाच्या सचिवांना यासंदर्भात निर्देश देऊन अधिसूचना रद्द करण्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. एमआयडी कायद्यानुसार हा अधिकार उद्योगमंत्र्यांना असून अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

नाणारमध्ये भूमिअधिग्रहणाची अधिसूचना रद्द झाल्याची घोषणा केल्यानंतर काही मिनिटांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही अधिसूचना रद्द करण्याचे अधिकार हायपॉवर कमिटीला आहेत. उद्योगमंत्र्यांना यासंदर्भात अधिकार नसल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात याविषयी असलेल्या एमआयडी कायदा १९६१ नुसार ही अधिसूचना रद्द करण्याचे अधिकार उद्योग विभागाला आहेत. त्यानुसार आज उद्योग सचिवांना यासंदर्भात निर्देश देऊन अधिसूचना रद्द करण्याचे निर्देश सुभाष देसाई यांनी दिले. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना सुभाष देसाई म्हणाले, अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय कायदा आणि नियमांचा अभ्यास करूनच घेतला होता. अधिसूचना निघाली होती, ती विनाअधिसूचित करण्यास सांगितले आहे. तसेच आज उद्योग खात्याच्या सचिवांना बोलावून प्रस्ताव तयार करायला सांगितले असून अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

नाणारप्रश्नी राज्याच्या आणि कोकणाच्याच हिताचा निर्णय घेणार

अधिसूचना रद्द करण्यासाठी देसाई उच्चाधिकार समितीला पत्र देऊ शकतात. देसाईंचं पत्र आल्यानंतर कमिटी सरकारला सल्ला देऊ शकते. मात्र हा सल्ला मानायचा की नाही हे सरकारवर अकलंबून आहे. कमिटीचा सल्ला सरकारला बंधनकारक नाही, मात्र नाणारप्रश्नी राज्य आणि कोकणाच्या हिताचाच निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

मंत्रिमंडळ बैठकीआधी शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

नाणार प्रकल्प रद्द करण्यासंदर्भात शिवसेना मंत्र्यांनी आज मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीआधी भेट घेतली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह परिवहनमंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हेही उपस्थित होते. कोकणावर नाणार प्रकल्प लादू नये. कोकण भकास करणारा विकास तेथील रहिवाशांना नको आहे, अशा आशयाचे पत्र यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या