गुजरातमध्येही ‘व्यापम’ घोटाळा, मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश देताना गैरव्यवहार

25

सामना ऑनलाईन, अहमदाबाद

मध्य प्रदेशप्रमाणे गुजरातमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश देतेवेळी ‘व्यापम’सारखा मोठा घोटाळा झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. माहिती अधिकाराखाली हा घोटाळा उघडकीस आला आहे.

गुजरात विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या बी. जे. मेडिकल कॉलेज आणि एनएचएल कॉलेज येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जानेवारी २०१५ मध्ये प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. ३०० जागांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेला ९०० विद्यार्थी बसले होते. यातील केवळ २०० विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षणासाठी उत्तीर्ण झाले. १०० जागा रिक्त राहिल्या होत्या, मात्र वैद्यकीय शिक्षण विभागातील अनेक डॉक्टर्स आणि बड्या अधिकाऱ्यांनी आपल्या मुलांना प्रवेश देऊन या १०० जागा भरल्याचे आरटीआयमध्ये उघडकीस आले आहे.

मेडिकल कौन्सिलच्या नियमानुसार वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर रिक्त जागा अशाप्रकारे भरल्या जात नाहीत. विद्यार्थी नापास झाला असेल तर जागा रिक्त ठेवल्या जातात, परंतु खोट्या गुणपत्रिका मेडिकल कौन्सिलकडे पाठवून वशिलेबाजीने अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या मुलांना प्रवेश दिला आहे. काही ठिकाणी तर जातीची खोटी प्रमाणपत्रे जोडण्यात आली आहेत. आरटीआयकडे मिळालेल्या कागदपत्रांमध्ये ही माहिती पुढे आली आहे. यासंबंधी पंतप्रधान कार्यालय आणि मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या