रंग प्रायोगिकतेचे

शिल्पा सुर्वै

प्रायोगिक रंगभूमीवर नुकताच मकरंद देशपांडेचा दर्शक महोत्सव पार पडला. पाहूया प्रायोगिक रंगभूमीवर मराठीचे रंग…

दी प्रायोगिक रंगभूमीवरील अवलिया मकरंद देशपांडे यांच्या ‘अंश’ नाटय़संस्थेचा ‘दर्शक’ महोत्सव २५ ते ३० जुलै दरम्यान जुहूच्या पृथ्वी थिएटरमध्ये पार पडला. महोत्सवाला दर्दी रसिकांची हाऊसफुल्ल उपस्थिती लाभली. हिंदीच्या तुलनेत मराठी प्रायोगिक चळवळ काहीशी थंडावली आहे. यामागे अनेक कारणं आहेत.

आधी व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांमधील फरक जाणून घेणे आवश्यक आहे. व्यावसायिक नाटकं व्यवसायासाठी, तर प्रायोगिक नाटकं फक्त प्रयोगासाठी केली जातात. नेहमीच्या नाटय़गृहात चौकोनी ठोकळ्यावर नेपथ्य (सेटस) उभारले की व्यावसायिक! एका छोटय़ा खोलीत, कमी प्रकाशयोजनेत आणि नेपथ्य नसलेले नाटक केले की ते प्रायोगिक! अशी नाटकं म्हणजे आपल्या आवाक्यातील नाही. त्यातून मनोरंजन कुठे होतं, डोक्याला व्याप कशाला लावून घ्यायचा, अशी सामान्य रसिकांची प्रायोगिक नाटकाबद्दलची मतप्रदर्शने असतात. पण प्रायोगिक नाटकांचा खास प्रेक्षकवर्ग आजही आहे. तो तयार केलाय काही दिग्गज रंगकर्मींनी.

विजय तेंडुलकर, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार, दामू केंकरे, कमलाकर सारंग, सई परांजपे, पं. सत्यदेव दुबे, विजया मेहता, शफाअत खान अशी काही नावे म्हणजे  प्रायोगिक रंगभूमीवरची विद्यापीठेच जणू. त्यांनी प्रायोगिक चळवळ उभी केली. असे असताना प्रायोगिक चळवळीचा वेग का मंदावला? मुंबईतील आविष्कार आणि पुण्यातील सुदर्शन सभागृह या दोन जागा सोडल्या तर प्रायोगिक चळवळीच्या वाटय़ाला हक्काची जागा कधीच आली नाही. प्रायोगिक नाटकांचे पाईक समजले जाणारे व्यावसायिक रंगभूमीकडे वळले आणि तिथून प्रायोगिकतेचे गोडवे गाऊ लागले. सिनेमा, मालिका ही माध्यमं त्यांना प्रिय झाली. कोणताही आर्थिक मोबदला न देणाऱया समांतर रंगभूमीपासून ती दूर गेली. एकीकडे पृथ्वी थिएटर हिंदी नाटकांची पंढरी झाली. आपण मात्र अशी कोणतीही पंढरी उभी करू शकलो नाही. मराठी प्रायोगिकतेचा प्रयोग यशस्वी कधी होणार, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

मकरंद देशपांडेंच्या ‘मॅडनेस’चे चाहते

प्रेक्षक ‘स्टोरी’साठी माझं नाटक बघत नाहीत, ते माझा ‘मॅडनेस’ बघतात… प्रायोगिक नाटकावर इतकं चपखल भाष्य मकरंद देशपांडे यांच्याशिवाय आणखी कोण करणार! गेली कित्येक वर्षे प्रेक्षक मुंबईतील हिंदी आणि इंग्रजी रंगभूमीवर मकरंदचा मॅडनेस बघत आहेत, त्याला प्रोत्साहित करीत आहेत. मकरंदने १९९३ साली त्यांनी ‘अंश’ नाटय़संस्थेची स्थापना केली. ‘अंश’ नाटय़संस्थेचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी आजपर्यंत ५० नवीन संहितांची नाटकं सादर केली आहेत. हा एक विक्रमच म्हणता येईल. रत्ना पाठक -शहा, सौरभ शुक्ला, शेखर सुमन, सोनाली कुलकर्णी, मिता वशिष्ठ, के. के. मेमन, अनुराग कश्यप, सुधीर पांडे, यशपाल यांनी ‘अंश’च्या नाटकात काम केले. पृथ्वी थिएटरमध्ये २५ ते ३० जुलै दरम्यान सादर झालेला ‘अंश’चा नाटय़महोत्सव मायबाप रसिकांना अर्पण करण्यात आला. यामध्ये खास आकर्षण ठरले ते ‘शेक्सपियरचा म्हातारा’ नाटक. शेक्सपियरला पुरून ४०० वर्षे झाली, तरीसुद्धा तो एक मिथक होऊन राहिलाय. रंगकर्मींना शेक्यपियरच्या किंग लिअरचे फार आकर्षण राहिलंय. किंग लियरला मकरंदने ‘शेक्सपियरचा म्हातारा’ या दोन अंकी नाटकात जिवंत केलंय. लेखन, दिग्दर्शन व म्हाताऱयाची प्रमुख भूमिका मकरंद करतात. दर्शक महोत्सवात ‘करोडों में एक’ हा त्यांचा आणखी एक यशस्वी नाटय़प्रयोग सादर झाला. वास्तक आणि मनोव्यापार यातली धूसर सीमारेषा पार केल्यावरची परिस्थिती नाटकात आहे. एका करोडपती माणसाची संपत्ती कमी होते आणि मानसिक रुग्ण बनतो. पुढे काही वर्षांनी तोच आजार त्याच्या मुलाला होतो. यात मकरंद यानी वडिलांची तर मुलाची भूमिका यशपाल यादव यांनी साकारलेय.

व्यावसायिक रंगभूमीवर प्रयोग होताहेत

शफाअत खान

रंगभूमीवरील नव्या ट्रेंडकडे नाटककार शफाअत खान लक्ष वेधतात. त्यांच्या मते रंगभूमीवर स्मार्ट, कलात्मक प्रयोग होत आहेत आणि प्रेक्षक ते स्वीकारत आहेत. अमर फोटो स्टुडियो, षष्ठ, शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकांनी तरुणांना आकर्षित केलंय. फक्त प्रयोग करण्याची जागा बदललेय, असे त्यांना वाटते.

नाटक फुलण्यासाठी अवकाश लागतं, एक स्टेज लागतं. हिंदी प्रायोगिक रंगभूमीला हक्काचे पृथ्वी थिएटर आहे. हिंदी नाटकांना राष्ट्रीय महोत्सवात प्रयोग मिळतात. ते देशात कुठेही प्रयोग करतात, त्यांना प्रायोजकही मिळतात. तसेच सरकारी ग्रँट मिळते. आपण वारंवार शासनाकडे प्रयत्न करूनही मराठी प्रायोगिक नाटकांसाठी जागा मिळवू शकलेलो नाही, याची खंत शफाअत खान व्यक्त करतात.

धोरणकर्ते आणि नाटकवाल्यांचा दोष

  • गीतांजली कुलकर्णी
  • मराठी प्रायोगिक रंगभूमीच्या आजच्या अवस्थेला धोरणकर्ते आणि नाटकवाले जबाबदार असल्याचे  अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांना वाटते. मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी, योनीच्या मनीच्या गुजगोष्टी, गजब कहानी, एक रिकामी बाजू अशा नाटकांतून गीतांजली यांना आपण भेटलोय. त्यांना मराठी प्रायोगिक चळवळ पूर्ण थंडावली असे वाटत नाही. त्या म्हणतात, मुंबईत आविष्कारने गेल्या दोन तीन वर्षांत चांगली नाटकं केली आहेत. पुण्यातही काही ना काही सुरू असतं. नाशिक येथील ग्रूपचे ‘हंडाभर चांदणं’ची चांगली चर्चा आहे. कल्याण येथील मिती चार ग्रूपच्या ललित प्रभाकरनेही चांगले नाटक केलंय. प्रयोग सुरू आहेत. त्यांना आर्थिक पाठबळ आणि जागा हवेय.  महाराष्ट्रात आपण कलेसाठी हक्काच्या किती जागा उभ्या करू शकलो, हा गीतांजली यांचा सवाल आहे. संजना कपूरने हिंदी रंगभूमीसाठी पृथ्वी थिएटर पुनरुज्जिवीत केलं. अरुंधती नाग यांनी रंगशंकरा उभारले. प्रोतिमा बेदी यांनी नृत्याग्रामची स्थापना केली.  आपण काय केले? आपण स्वतला नाटय़प्रेमी म्हणतो, पण नाटकासाठी आपण अशी कोणती जागा उभी करू शकलो? त्यासाठी इतक्या वर्षात सरकारला कन्वियन्स करू शकलो नाही. कलेला एक व्हिजन लागते. ते आपल्याकडे आहे का? पुढच्या २० वर्षांत मराठी रंगभूमी कुठे असेल? त्याचे कोणते धोरण आहे का तयार? प्रायोगिक नाटकाचे फेस्टिवल आपल्याकडे का होत नाहीत?  अमेरिकेतील डेट्रॉईटला जागतिक मराठी परिषदेत प्रायोगिक नाटकं आयोजित करावीशी का वाटत नाहीत?, गीतांजली यांचे सवाल अस्वस्थ करणारे आहेत…आपल्या नाटय़प्रेमाचे आत्मपरीक्षण करणारे आहेत.
  • आता नव्या ..भूमिकेत!

नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य… नुसतं नाव ऐकलं तरी डोळ्यांसमोर उभा राहतो ‘घातक’ सिनेमातील ममता कुलकर्णीच्या ‘कोई जाए तो ले आए’ या आयटम साँगमधला, लठ्ठ असूनही बिनदिक्कत नृत्याच्या स्टेप्स करणारा अभिनेता… याच गणेशजींनी ‘भिकारी’ सिनेमाद्वारे केवळ सिनेमा निर्मितीच नाही तर दिग्दर्शनातही पाऊल ठेवलंय. या सिनेमासाठी त्यांनी आपल्या २००किलो वजनापैकी ८६ किलो वजन घटवलं. नृत्य दिग्दर्शन ते सिनेमाची निर्मिती या प्रवासाबद्दल त्यांनी भरभरून गप्पा मारल्या.

निर्मिती आणि दिग्दर्शन करायचं मी आधीच ठरवलं होतं. फक्त चांगल्या कथेच्या शोधात होतो. आई आणि तिच्या मुलाचं कथानक मिळालं आणि लगेच सिनेमाच्या निर्मितीला हात घातला, असं ते सांगतात. आचार्य यांच्या ‘भिकारी’ या सिनेमात स्वप्नील जोशी प्रमुख भूमिकेत आहे. रुचा इनामदार, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे, गुरू ठाकूर, कीर्ती आडारकर, सुनील पाल वगैरेंच्या भूमिका आहेत. अब्बास अली मोगुल यांनी ऍक्शन दृश्ये दिली आहेत. गुरू ठाकूर यांनी पटकथा संवाद लिहिलेत. एक मस्त एंटरटेनर फिल्म आहे. कौटुंबिक फिल्म आहे. सगळ्यांना आवडेल अशी आहे. गणपती येत आहेत. यात एक भव्यदिव्य गणपतीगीत आहे. कॉमेडी, रोमान्स, ऍक्शन आहेतच, पण यात इमोशन्स जास्त दिसतील. आईसाठी एक श्रीमंत मुलगा भिकारी बनतो अशी खरी गोष्ट आहे.

गणेश आचार्य हे उत्तम कोरिओग्राफर आहेतच. सिनेमा निर्मिती आणि दिग्दर्शन यात उतरले असले तरी यातही त्यांचा डान्स, त्यांची कोरिओग्राफी पाहायला मिळणारच आहे. यातील गणपतीच्या गाण्याची कोरिओग्राफी त्यांनीच केली असून ते स्वतःही त्यात नाचले आहेत. ते पाहायला खरोखर मजा येईल. मराठी व हिंदी चित्रपटांत काय फरक जाणवला असं विचारता ते म्हणतात, काहीच फरक जाणवत नाही. म्हणूनच तर हिंदीत कोरिओग्राफर म्हणून बरंच काम केल्यावरही मराठीत सहजतेने सिनेमा बनवला. वजन घटविण्याबाबत त्यांनी म्हटले की, माझं वजन खरंच खूप वाढलं होतं… पण ‘भिकारी’साठी मुद्दाम वजन घटवलं. यासाठी स्वीमिंग केलं, जिम केलं. खूप व्यायाम केला.

हिला सिनेमा मराठीतच…माझा जन्म चाळीत झालाय. महाराष्ट्रात राहतोय. माझी आई मराठी आहे. त्यामुळे लहानपणापासूनच मराठी भाषेबद्दल एक ओढ, आस्था होती. शिवाय आजकाल हिंदी भाषेतील सिनेमांसारखंच मराठी सिनेमांनाही चांगलं यश मिळतंय. मराठी सिनेमे कुठेही कमी नाहीत. त्यामुळे पहिला सिनेमा बनवायचा तो मराठीतच असं ठरवलं होतं. भाषा कोणतीही असली तरी बॉलीवूडमधल्या मोठमोठय़ा कलाकारांनीही या सिनेमाच्या प्रमोशनला, म्युझिक रिलीजला हजेरी लावली आहे.

आजचा मराठी सिनेमा आशयघन..आजच्या मराठी सिनेमाबद्दल वाईट कुणी बोलूच शकणार नाही. कारण आजचा मराठी सिनेमा आशयघन आहे. सिनेमात आशय असेल तर त्याला हमखास यश मिळते. कॉमेडीही चांगली असायला हवी. अशोकमामांचा ‘शेंटीमेंटल’ येतोय. ‘हृदयांतर’ नुकताच येऊन गेला. कंटेंट असलेले सिनेमे जास्तीतजास्त असतात ते फक्त मराठीतच… सिनेमाच्या यशापयशाबद्दल आपण सांगू शकत नाही, पण चांगल्या कंटेंटचे सिनेमे देणं आपल्या हातात असतं. अलीकडचे मराठी सिनेमे चांगले विषय घेऊन आले आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या