न्यायालयाच्या आदेशानंतरही रुजू करून घेण्यास टाळाटाळ; प्राध्यापकाचे महाविद्यालयासमोर बेमुदत उपोषण

निलंबित केल्यानंतर पुन्हा रुजू करून घेण्याचा आदेश न्यायालयाने दिल्यानंतरही रुजू करून घेण्यास मागील 23 वर्षांपासून टाळाटाळ होत असल्याबद्दल प्रा.उदय धानुरे यांनी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला तीन दिवस उलटले तरी अद्याप महाविद्यालय प्रशासनाने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले आहे.

एमसीव्हीसी या अभ्यासक्रमासाठी उदय धानुरे यांना 1991 साली प्राध्यापक म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. 1994 साली त्यांना कामावरून कमी करण्यात आले. पुन्हा रुजू करून घेण्यासाठी धानुरे यांनी शाळा न्यायाधिकरणाचा दरवाजा ठोठावला.न्यायाधिकरणाने 1997 मध्ये धानुरे यांना रुजू करून घ्यावे, असे आदेश दिले. संस्थाचालकांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली. यामुळे धानुरे उच्च न्यायालयात गेले.

डिसेंबर 2019 व फेब्रुवारी 2020 मध्ये उच्च न्यायालयाने धानुरे यांना रुजू करून घेण्याचे आदेश संस्थेला दिले. पण अद्यापही महाविद्यालय प्रशासन रुजू करून घेण्यास टाळाटाळ करत आहे. याच्या निषेधार्थ धानुरे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रजासत्ताक दिनापासून त्यांचे हे उपोषण सुरू आहे. मात्र, अद्यापही महाविद्यालय प्रशासनाने कुठलीही हालचाल केलेली नाही. महाविद्यालय प्रशासन आणि संस्थाचालकांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत आपल्याला रुजू करून घेइपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धार प्रा.धानुरे यांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या