सरकारने लालबहादूर शास्त्रींच्या रहस्यमय मृत्यूची चौकशी करावी- प्रा. अनुज धर

542

केंद्रातील काँग्रेसच्या सरकारांनी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या रहस्यमय मृत्यूची चौकशी केली नाही. उलट हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. आता केंद्रात असणाऱ्या सरकारने शास्त्रीजींच्या मृत्यूची चौकशी करावी आणि सत्य समोर आणावे , असे मत नवी दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक प्रा. अनुज धर यांनी व्यक्त केले .

अभाविप विवेकानंद संस्कार संस्थेच्या वतीने आयोजित व्याख्यानात प्रा. अनुज धर बोलत होते. लक्ष्मीरमण लाहोटी यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या व्याख्यानास संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. संजय पांडे व डॉ. राजेश पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. ‘लालबहादूर शास्त्रीजींचा रहस्यमय मृत्यु’ या विषयावर बोलताना प्रा. अनुज धर यांनी या विषयाचे वेगवेगळे पैलू मांडले. अनेक वर्ष अभ्यास केल्यानंतर शास्त्रीजींचा मृत्यू विष प्रयोगाने झाला असावा असे माझे वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी सांगितले. ताश्कंदचा करार केल्यानंतर शास्त्रीजींचा त्याच दिवशी रात्री मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह दिल्लीत आणला. वास्तविक तत्कालीन सोव्हिएत रशियाने शवविच्छेदन करण्याची तयारी दाखवली होती परंतु हिंदुस्थानकडून ती नाकारण्यात आली. शास्त्रीजींचे  कुटुंबीय आणि इतर काही जणांनी उपस्थित केलेले प्रश्नही दडपण्यात आले. हे प्रकरण शांत झाल्यानंतर 2001 पासून मी अभ्यास केला. संसदेत यासंदर्भात झालेल्या चर्चेची माहिती घेतली. उपलब्ध पुराव्यांचा अभ्यास केला. त्यावरून शास्त्री यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. त्यांना हार्ट अटॅकही आलेला नव्हता हे लक्षात आले. या रहस्यमय मृत्यूची चौकशी करण्याऐवजी इंदिरा गांधींच्या सरकारने प्रकरण दाबले, असेही ते म्हणाले.

सत्यमेव जयते असा उद्घोष करणाऱ्या सरकारांनी या रहस्यमय मृत्यूचा तपास केला नाही. त्यामुळे आता सत्तेवर असणाऱ्या सरकारने सर्वप्रथम या संदर्भात आपल्याकडे असणारे सर्व पुरावे आणि कागदपत्र उघड केले पाहिजेत. ही कागदपत्रे लपवण्याची कसलीही गरज नाही. स्वतः कागदपत्रे जाहीर केल्यानंतर ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथील सरकारकडे असणारी कागदपत्रे तपासली पाहिजेत. विशेष म्हणजे तेथील सरकार माहिती जाहीर करण्यास तयार आहे. त्यामुळे हिंदुस्थान सरकारने पंतप्रधानांच्या अध्यक्षतेत समिती नेमून या प्रकरणाचा तपास केला पाहिजे. गृहसचिव तसेच परराष्ट्र खात्यातील अधिकारी, गुप्तहेर यंत्रणेतील अधिकारी या समितीत असावेत. संपूर्ण कागदपत्रांचा आणि पुराव्यांचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रीजींच्या मृत्यूचे खरे कारण निश्चितपणे समोर येईल, असा विश्वासही प्रा. धर यांनी व्यक्त केला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. ॲड . संजय पांडे व डॉ. राजेश पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेश पाटील व संचलन प्रा. डॉ  प्रीती पोहेकर यांनी केले. दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानास लातूरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

आपली प्रतिक्रिया द्या