प्राचार्य गजमल माळी

140

महात्मा फुले यांच्या विचारधारांची कास धरणारे मराठवाडय़ातील परिवर्तनशील ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी अशीच प्राचार्य गजमल माळी यांची ओळख होती. सत्यशोधक साहित्यावर त्यांनी केलेले संशोधनात्मक लिखाण आजही अभ्यासकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. ते लेखक असले तरी नव्या पिढीतील लेखकांना त्यांचे सतत मार्गदर्शन व प्रेरणा असायची. गजमल माळी यांचा मूळ पिंड चळवळीचा असल्याने त्यांचे योगदान, मग ते नामांतर आंदोलन, दलित साहित्याची चळवळ, सत्यशोधक चळवळ, मंडळ आयोग आंदोलन यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.

माळी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष असा की, ते एकाच वेळी कार्यकर्ते होते आणि कवीही होते. मराठी भाषेवर त्यांचे प्रभुत्व असल्याने साहित्य क्षेत्रात त्यांनी मौलिक कामगिरी केली. ‘गंधवेणा’, ‘नागफणा’ आणि ‘सूर्य उद्ध्वस्त प्राचीन राजधानी’ हे कवितासंग्रह. तुकारामांचे निवडक अभंग, प्राचीन आख्यानक कविता, लोकशाहीचा शब्दकोश, महात्मा फुले यांचे निवडक विचार, ज्ञानेश्वरीतील निवडक वेचे, सत्यशोधक समाज परिषद, अध्यक्षीय भाषणे याचे त्यांनी साक्षेपी संपादन केले. माळींमधील लेखकाने सातत्याने संशोधकीय अंगाने लेखन केले. त्याचसोबत राष्ट्रीय काँग्रेस आणि सत्यशोधक समाज, वैदिक धर्म परंपरा आणि महात्मा फुले यांचे सहकारी, फैजपूर काँग्रेस, ग्यानोबा कृष्णाजी ससाणे (चरित्र), महात्मा जोतिबा फुले आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर याविषयीचे त्यांनी केलेले लिखाण आजही अभ्यासकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

जळगाव जिह्यात वरणगाव येथे जन्म झालेल्या माळी यांचा साहित्य प्रवास संभाजीनगरात घडला. उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी इंटरआर्टस्पर्यंत शिक्षण घेतले. मिलिंद महाविद्यालयातून आणि तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी सुवर्णपदकाने एम.ए. संपादन केले. तद्नंतर देवगिरी महाविद्यालय, पं. जवाहरलाल नेहरू महाविद्यालय यात संस्थापक प्राचार्य म्हणून सेवा केली व नंतर निवृत्त झाले. माळी यांच्या लेखन संशोधनाबद्दल त्यांचा विविध पुरस्कारांनी सन्मान झाला होता. रशियामधील मॉस्को विद्यापीठात व बल्गेरियामधील सोफिया युनिर्व्हसिटीमध्ये ‘ऑन द कॅरीडॉर ऑफ टाइम’ या नावाने त्यांचा मराठीतील कवितासंग्रह ‘नागफणा’ आणि ‘सूर्य’ इंग्रजीत अनुवादित झाला. तसेच बल्गेरिया येथे झालेल्या मुन्शी प्रेमचंद जन्मशताब्दी महोत्सवात त्यांनी मराठी भाषेचे प्रतिनिधित्व केले. प्राचार्य गजमल माळी यांनी मराठवाडा साहित्य परिषदेचे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद भूषविले. त्यांच्या निधनाने पुरोगामी विचारांची भूमिका असणारा लेखक चिरंतनाच्या प्रवासाला गेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या