गुण वाढवून देण्याचे आमिष, विद्यार्थिनीशी अश्लील चॅटिंग करणाऱ्या शिक्षकाला चोपले

12

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

अर्धांगवायूचा झटका आलेल्या वडिलांच्या सेवेसाठी गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थिनीला परिक्षेत गुण वाढवून देण्याचे अमिष दाखवून तिच्याशी मैत्री करण्यासाठी दबाव टाकून अश्लील चँटींग करणाऱ्या प्राध्यापकास नातेवाईकांनी बेदम चोप देत तोंडाला काळे फासून क्रांती चौक पोलिसांच्या हवाली केले. ही संतापजनक घटना आज दुपारी सरस्वती भुवन महाविद्यालयात घडली. या घटनेमुळे महाविद्यालयात खळबळ उडाली आहे. तर घटनेची गंभीर दखल घेत महाविद्यालय प्रशासनाने प्राध्यापकाची हकालपट्टी केली आहे.

शहरातील सरस्वती भुवन वाणिज्य महाविद्यालयात १९ वर्षीय विद्यार्थिनी १२ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. याच विभागात वंâत्राटी प्राध्यापक मनोज जैस्वाल हा कार्यरत आहे. पीडित विद्यार्थिनीवर त्याचा गेल्या दोन महिण्यापासून डोळा होता. तो नेहमी तिला व्हिडीओ कॉल करायचा. यावेळी तो तिच्याशी अश्लील चॅटिंग करत तिला अश्लील नृत्य करण्याचा आग्रह करायचा.

प्राध्यापक तिचा छळ करत असल्याचे तिने भावाला सांगितले होते. भावाने सोमवारी त्याच्या काही मित्र व नातेवाईकांसोबत महाविद्यालय गाठले. प्राध्यापक कक्षात जावून त्याने मनोज जैस्वाल यास जाब विचारत मारहाण करून त्याच्या तोंडाला काळे फासले. परीक्षा सुरू असल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला होता. मोठा जमल्याचे कळताच क्रांती चौक पोलीस प्रचंड फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. प्राध्यापकाने विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे केल्याने पालक वर्गात संतापाची लाट उसळली होती. अनुचित प्रकार घडु नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस बंदोबस्तात मनोज जैस्वाल यास क्रांती चौक पोलिसांनी ठाण्यात नेले. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गंभीरराव यांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. प्राध्यापक मनोज जैस्वाल हा विवाहित असून त्यास दोन अपत्ये आहेत.

आमिषाला बळी न पडल्याने दिली नापास करण्याची धमकी
संबंधित विद्यार्थिनीच्या वडिलांना अर्धांगवायुचा झटका आलेला होता त्यामुळे त्यांच्या सेवेत गेल्या काही दिवसांपासून पुणतांबा येथे ती राहत होती. महाविद्यालयात सतत गैरहजर राहत असल्याचा फायदा घेत जैस्वाल याने गुण वाढवुन देण्याचे तसेच पास करण्याचे आमिष दाखवून तिच्याशी संपर्क करण्यास सुरुवात केली. तरूणीने मैत्री करण्यास नकार देताच जैस्वाल याने तिला अश्लील मॅसेज पाठवण्यास सुरुवात केली. हा प्रकार समजल्यावर मुलीच्या भावाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत बहिणीचा व्हॉटस्अप स्वत:च्या मोबाईलवर वळवून तो चेक केला असता हा घाणेरडा प्रकार उघडकीस आला. जैस्वाल याने यापूर्वी देखील काही मुलींशी गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला असल्याचे कळते. मात्र, बदनामीच्या भीतीने या मुलींनी त्याची जाहीर वाच्यता केली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या