प्रा. यशपाल

50

प्रशांत गौतम

प्रख्यात वैज्ञानिक, कुशल व्यवस्थापक, शिक्षणतज्ञ विज्ञान प्रसारक अशी बहुआयामी ओळख असणारे व्यासंगी व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. यशपाल. त्यांच्या निधनाने डॉ. होमी भाभा आणि डॉ. विक्रम साराभाई यांच्या पिढीतील दुवा निखळला आहे. पद्मभूषण आणि पद्मविभूषण या नागरी पुरस्कारांचे मानकरी असलेले यशपाल हे विज्ञान आणि तंत्रज्ञानात सदैव रमलेले असत. वैज्ञानिकांमध्ये सतत आत्मविश्वास निर्माण करणे, सतत नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणणे, नावीण्यपूर्ण कामासाठी प्रेरणा देणे, गावातील दुष्काळ, पूर, वाया गेलेले पीक, बालविवाह प्रश्न असो की, सतीची चाल हा प्रश्न असो, विद्यार्थ्यांना एखादा प्रकल्प समजावून सांगणे असो की, एखाद्या नाटकाविषयीची चर्चा असो, असे एक ना अनेक प्रश्न सोडवण्यात यशपाल व्यस्त असत. या लोकाभिमुख स्वभावामुळे त्यांनी लोकांना वैज्ञानिक दृष्टी तर दिलीच; पण त्याचसोबत विज्ञान प्रचार आणि प्रसाराच्या असंख्य कल्पना राबवल्या. विज्ञानाच्या अति क्लिष्ट संकल्पना सहज, साध्या सोप्या भाषेत समजावून सांगाव्यात त्या यशपाल यांनीच. त्यात त्यांची विलक्षण हातोटी होती. यशपाल यांचे व्यक्तिमत्त्व असे होते की, प्रयोगशाळेबाहेर येऊन सर्व प्रकारच्या माध्यमांद्वारे ते लोकांशी संवाद साधत असत. म्हणूनच विज्ञानाला लोकाभिमुख करणे आणि लोकांना विज्ञानाभिमुख करणे या महत्त्वाच्या प्रक्रियेत यशपाल यांचे लक्षणीय योगदान आहेच, यात कोणतीही शंका नाही.

२६ नोव्हेंबर १९२६ रोजी झांग (आताचे पाकिस्तान) येथे जन्म झालेल्या यशपाल यांचा प्रवास ९० व्या वर्षी थांबला. आयुष्यातील त्यांचा याही वयातला उत्साह अनेकांना प्रेरणा देत असे. यशपाल यांचा जन्म पाकिस्तानात. बालपण बलुचिस्तानातील क्वेटा भागात गेले. प्रारंभापासूनचा हा प्रवास वेगळा होता. १९३५ च्या भूकंपात त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले. आजोळी आश्रय घेतल्यानंतर पुन्हा क्वेटा गाठले. तेथे शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांच्या बालमनात विज्ञानाबद्दलची जिज्ञासा निर्माण झाली. शाळेत तर हुशार होते. शिक्षकांच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे यशपाल यांच्याकडे तयार असत. त्यातूनच त्यांची मित्रमंडळीत (मोटा सीर) हुशार डोकं अशी ओळख निर्माण झाली. विमानाचे आकर्षण तर त्यांच्या मनात आधीपासूनच होते. त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी त्यांनी त्या भागातले विमानतळ सायकल प्रवास करून गाठले. वडिलांची बदली बलुचिस्तानातून मध्य प्रदेशात जबलपूर येथे झाली. १९४९ साली पुढच्या शिक्षणासाठी पंजाब विद्यापीठात भौतिकशास्त्रात पदवी घेतली. १९५८ साली पीएच.डी.साठी एमआयटी गाठली व नंतर टाटा मूलभूत संशोधन संस्थेत रुजू झाले. यशपाल जे ओळखले जातात ते वैश्विक किरण अभ्यासासाठी. त्यात त्यांनी भरीव योगदान दिले.

संशोधन कार्याच्या अध्ययन, अध्यपनासोबतच विविध जबाबदारीची पदे त्यांनी सांभाळली. १९७२ मध्ये केंद्र सरकारने भारतीय अंतराळ संस्थेची स्थापना केली त्या संस्थेच्या अंतर्गत स्पेस ऑप्लेकेशन सेंटर सुरू झाले त्याची धुराही अर्थातच यशपाल यांच्याकडेच आली. १९७५-७६ या कालावधीत उपग्रह अध्ययन दूरचित्रवाणी प्रयोग (एसआयटीई) वर काम केले आणि शिक्षणाच्या माध्यमांना नवी दिशा दिली. संशोधन, विज्ञान, प्रचार आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे ठसठशीत योगदान, लक्षात घेऊन अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱया, पदे त्यांना प्राप्त झाली.

नियोजन आयोगाचे सल्लागार, विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे सचिव, विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष येथेही यशपाल यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची मोहर उमटवली. यूजीसीचे अध्यक्ष असताना त्यांनी आंतरविद्यापीठ केंद्राची संकल्पना राबवली. पुण्यात असलेले आंतर विद्यापीठ, खगोलशास्त्रज्ञ आणि खगोल भौतिकी केंद्राची (आयुका) स्थापना ही त्यांचीच संकल्पना दिल्लीच्या नेहरू विद्यापीठाचे कुलपती असणाऱया यशपाल यांनी समाजशास्त्र आणि मानव्य शाखासाठीही आंतरविद्यापीठ संकल्पनेला बळ दिले. दूरदर्शनच्या टर्निंग पॉइंटमध्ये अथवा खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी त्यांची कॉमेंट्री कोणीही विसरू शकणार नाही. यशपाल यांच्या निधनाने विज्ञान-तंत्रज्ञान, शिक्षण, सामाजिक क्षेत्रात आणि लोकांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करून देणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या