बारावीच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांचे भवितव्य टांगणीलाच

13
exam_prep
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन, मुंबई

बारावीच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांचे भवितव्य अद्यापही टांगणीलाच आहे. ज्युनियर कॉलेज शिक्षकांच्या तीन मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत, मात्र अंमलबजावणीचे लेखी आदेश निघत नाहीत तोवर तपासलेल्या उत्तरपत्रिका आणि मार्कशीट बोर्डात जमा न करण्यावर शिक्षक ठाम आहेत.

शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत गुरुवारी ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशनची बैठक पार पडली. या बैठकीत असोसिएशनने केलेल्या आठ मागण्यांपैकी तीन मागण्या मान्य करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र या मागण्यांच्या अंमलबजावणीचे लेखी आदेश अद्याप शिक्षण विभागाने काढलेले नाहीत. हे आदेश निघेपर्यंत तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डात जमा करणार नाही, असा पवित्रा असोसिएशनने घेतला आहे.

कायम विनाअनुदानित ज्युनियर कॉलेजपैकी अनुदानास पात्र कॉलेजांची यादी जाहीर करणे, शिक्षकांच्या १७१ पदांसाठी आर्थिक तरतूद करणे आणि मे २०१२ नंतर नियुक्ती केलेल्या शिक्षकांच्या पदांना मान्यता देण्याच्या मागणीची अंमलबजावणी करण्याचे आदेश आज झालेल्या बैठकीत निघाले आहेत. या मागण्यांच्या अंमलबजावणीचा लेखी आदेश निघाल्यावर आम्ही तातडीने तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डात जमा करू असे असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या