प्रोजेक्ट अंतराळसृष्टी…

58

श्वेता पवार-सोनवणे, [email protected]

नासामध्ये पुन्हा एकदा मराठमोळा झेंडा रोवला आहे. पुण्याच्या तन्मय सामक आणि चिन्मय सामक या दोन विद्यार्थ्यांच्या अंतराळसृष्टी प्रकल्पाची नासाकडून निवड करण्यात आली आहे…

कॉलेजचे दिवस म्हणजे सोनेरी दिवस. मज्जा, मस्ती, सोशल नेटवर्किंग करण्यात तरुणाई गुंतलेली असते. लहानपणापासून ज्या दिवसांची आतुरतेने वाट पाहत असतो ते हे मंतरलेले दिवस असतात. पण पुण्यातील दोन जुळ्या भावांनी या सगळ्यापासून स्वतःला दूर ठेवत आपली एक वेगळीच वाट निवडली आहे. ‘रोबोटिक्स’ या अतिशय कठिण विषयात तन्मय सामक आणि चिन्मय सामक या दोन मराठमोळ्या विद्यार्थ्यांनी हिंदुस्थानचा झेंडा सातासमुद्रापार फडकवला आहे…

जगातील सर्वात मोठी अंतराळ संशोधन संस्था ‘नॅशनल ऍरोनॉटिक्स ऍण्ड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन’ने (नासा) आयोजित केलेल्या ‘नासा एम्स स्पेस सेटलमेंट डिझाईन कॉन्टेस्ट’ या स्पर्धेत तन्मय आणि चिन्मयच्या ‘प्रोजेक्ट अंतराळसृष्टी’ या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तब्बल १५०० प्रकल्पांमधून तन्मय आणि चिन्मयच्या प्रकल्पाला पहिला पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे सलग दुसऱया वर्षी त्यांनी या स्पर्धेत बाजी मारत प्रथम क्रमांक मिळवला आहे. नुकताच त्या दोघांचा ‘इंटरनॅशनल स्पेस डेव्हलपमेंट कॉन्फरन्स’मध्ये जगातील हजारो लोकांसमोर सत्कार करण्यात आला.

‘नासा एम्स रिसर्च सेंटर आणि नॅशनल स्पेस सोसायटी’तर्फे जगभरातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. मानवाला अंतराळात राहण्यासाठी काय करावे लागेल? तिथे मानवसृष्टी कशी तयार करता येईल? या विषयावर आधारीत प्रोजेक्ट प्रत्येक विद्यार्थ्याला तयार करायचा असतो. गेल्या वर्षी या स्पर्धेत तन्मय आणि चिन्मयने ३५,००० लोकं एकावेळी अंतराळात कसे राहू शकतात हे त्यांच्या प्रोजेक्टमधून दाखविले होते. त्यासाठी त्यांनी ६५० पानांचा ‘प्रोजेक्ट स्पेक्ट्रा’ हा प्रकल्प तयार केला होता. त्या प्रकल्पालादेखील प्रथम पारितेषिक मिळाले होते.

पहिल्याच प्रयत्नात एवढे मोठे यश मिळाल्याने तन्मय आणि चिन्मयचा हुरुप वाढला आणि त्यांनी या वर्षी पुन्हा या स्पर्धेत भाग घेतला. मात्र या वर्षी काही नियम बदललेले होते. एकतर अगणित लोकांना अंतराळ राहण्यासाठी काय करावे लागेल हे प्रोजेक्टमधून दाखवायचे होते तसेच हा प्रोजेक्ट फक्त शंभर पानांत पूर्ण करायचा होता. त्यात अजून एक अडथळा होता तो म्हणजे बारावीच्या परिक्षेचा. फेब्रुवारी महिन्यात या दोघांची बारावीची परिक्षा आणि मार्च महिन्यात त्यांना हा प्रोजेक्ट सादर करायचा होता. त्यामुळे ते दिवसा बारावीचा अभ्यास करायचे आणि रात्री जागून प्रोजेक्टवर काम करत करायचे. अशाप्रकारे त्यांनी दोन्ही परीक्षा यशस्वीपणे पार पाडल्या.

‘नासा’सारख्या जगातील सर्वात मोठय़ा अंतराळ संशोधन संस्थेच्या स्पर्धेत प्रकल्प सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळा तसेच शिक्षकांकडून मदत मिळते. परदेशात तर अनेक कंपन्या या विद्यार्थ्यांना मदत करत असतात तसेच अशा स्पर्धांसाठी विशेष ‘गायडन्स क्लासेस’ही असतात, पण त्यांनी कुणाचीही मदत न घेता हा प्रोजेक्ट तयार केला आहे. इंटरनेटवर या विषयावर संशोधन केले, लायब्ररीत जाऊन अनेक पुस्तकं वाचली त्यातून नोंदी करुन त्यांनी हा प्रोजेक्ट तयार केला आहे. त्यामुळे तन्मय आणि चिन्मय अमेरिकेत जेव्हा गेले तेव्हा तिथे त्यांचे कौतुक झाले.

अंतराळसृष्टी प्रकल्पाविषयी…

तन्मय आणि चिन्मयच्या ‘प्रोजक्ट अंतराळसृष्टी’ या प्रकल्पात त्यांनी असंख्य लोकांसाठी अंतराळात शहर कसे तयार करायचे हे दाखविले आहे. त्यासाठी त्यांनी एका काल्पनिक शहराचे ‘इक्वेटोरीयल लॉ अर्थ ऑर्बिट’मध्ये एक मॉडेल तयार केले. अंतराळात मानव अल्युमिनियम, टायटॅनियम, ऍण्टीब्रीचपासून तयार केलेल्या भिंतीच्या घरात राहणार तर त्या घरासाठी लागणारी सोलार पॅनेलचा वापर करुन वीजनिर्मिती केली जाणार. शहरातील पायाभूत सुविधांसाठी अल्युमिनीयम, टायटॅनियम, कार्बन फायबरचा वापर करण्यात येईल. या शहरात पाणी, रस्ते, वाहतक व्यवस्था, इमारती, उद्योगधंदे सर्व असणार आहे. तसेच असे शहर तयार करण्यासाठी ५०० अब्ज डॉलरचा खर्च येऊ शकतो. असे तन्मय आणि चिन्मयने प्रकल्पात मांडले आहे.

तन्मय आणि चिन्मय विषयी...

पुण्यातील राजीव गांधी ऍकॅडमी ऑफ ई लर्निंगचे विद्यार्थी असलेले तन्मय आणि चिन्मय नुकतेच बारावीची परिक्षा पास झाले आहेत. बारावीत तन्मयला 83टक्के तर चिन्मयला 82टक्के मिळाले आहेत. या दोघांनाही रोबोटिक्समध्ये करिअर करायचे आहे. सध्या ते मेकॅट्रोनिक्स शाखेतून ग्रॅज्युएशन करणार आहेत व त्यानंतर परदेशात जाऊन रोबोटिक्स या विषयात त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे आहे. तन्मय आणि चिन्मय रोबोटिक्सचे शिक्षण भलेही परदेशात जाऊन घेणार असले तरी ते मायदेशी परतून हिंदुस्थानची रोबोटिक्समध्ये प्रगती व्हावी म्हणून काम करणार आहेत.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या