‘मी पण चौकीदार’, म्हणत सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट हबीब यांचा भाजपमध्ये प्रवेश

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट आणि देशभरात पसरलेल्या सलून उद्योगाचे मालक जावेद हबीब यांनी सोमवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. एएनआय वृत्तसंस्थेने याचे फोटो प्रसिद्ध केले आहे.

पहिल्या फोटोमध्ये हेअर स्टायलिस्ट हबीब यांच्या गळ्यात कमळाचे निशाण असणारे उपरणे आणि मागे भारतीय जनता पक्षाचे बॅनर दिसत आहेत. तसेच त्यांच्या हातामध्ये भाजपचे सदस्यत्व घेतलेली एक चिठ्ठीही दिसत आहे. जावेद हे अन्य एका फोटोमध्ये भाजपच्या अन्य सदस्यांसोबत चर्चा करत असल्याचे दिसत आहे.

भाजप पक्षप्रवेशावेळी जावेद म्हणाले की, आतापर्यंत मी केसांचा चौकीदार होतो आणि आता देशाचा चौकीदार झालो आहे. जावेद हे सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट म्हणून ओळखले जातात. देशभरामध्ये विविध शहरात त्यांचे शेकडो सलून आहेत. जावेद यांच्याआधी अनेक बॉलिवूड कलाकारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.