फक्त क्रिकेटला प्रोत्साहन नको, अन्य खेळांवरही लक्ष द्या ! मद्रास उच्च न्यायालयाचे आदेश

सामना ऑनलाईन, मदुराई

हिंदुस्थानात क्रिकेट या खेळालाच जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे इतर खेळ व खेळाडूंवर अन्याय होतो. यापुढे फक्त क्रिकेटलाच प्रोत्साहन देऊ नका. इतर खेळ व खेळाडूंना एकसमान वागणूक व न्याय द्या, असे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला दिले आहेत.

आशियाई पॅसिफिक विशेष ऑलिम्पिक खेळांमध्ये बौद्धिकदृष्टय़ा अपंगत्व आलेल्या खेळाडूंच्या संदर्भात दाखल झालेल्या याचिकेनंतर न्यायालयाने हे ताशेरे ओढले आहेत. अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये जे खेळाडू सहभागी होतात त्यांनादेखील सर्व प्रकारच्या सोयीसुविधा आणि सन्मान दिला जावा, असे याचिकेत म्हटले होते. या पार्श्वभूमीवर न्या. एस. एस. सुंदर आणि न्या. एन. किरुबाकरन यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने राज्याला व केंद्र शासनाला 24 एप्रिलपर्यंत त्यांचे म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.