२२ लाखांचा मालमत्ता कर थकला, गेंदा भवनला सील ठोकले

9

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

वॉर्ड कार्यालयाअंतर्गत असलेल्या गेंदा भवनकडे सुमारे २२ लाखांची थकबाकी आहे. ही थकबाकी भरण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने शनिवारी या इमारतीला सील लावण्यात आल्याची माहिती वॉर्ड अधिकारी भालचंद्र पैठणे यांनी दिली.

मालमत्ता कराची शहरात कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याने महानगरपालिकेने वसुलीची मोहीम तीव्र केली आहे. प्रभाग क्रमांक एकमार्फत थकबाकी असलेल्या मालमत्तांना सील लावण्याची कारवाई केली जात आहे. गेंदा भवन इमारतीचा मालमत्ता कर २२ लाख रुपये एवढा थकला आहे. वारंवार नोटीस बजावण्यात आली होती. पाठपुरावा करूनही कर भरण्यास टाळाटाळ करीत थकीत रक्कम भरण्यात येत नव्हती. त्यामुळे शनिवारी पथकप्रमुख अविनाश मद्दी, सतीश कुलकर्णी यांनी गेंदा भवनला सील ठोकले.

एसटी कार्यालयाचे सील काढले
एसटी महामंडळाच्या आगार क्रमांक दोन (मध्यवर्ती बसस्थानक) कार्यालयाला चार लाख १५ हजार रुपयांची थकबाकी भरण्याची नोटीस बजावली होती. वारंवार पाठपुरावा करूनदेखील थकीत रक्कम भरण्यात येत नसल्याने मनपाच्या पथकाने कार्यालयातील कॅबीनला सील लावले. विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंबंधी माहिती मिळताच त्यांचीही धावपळ उडाली. विभागीय स्थापत्य अधिकारी मीनल मोरे यांनी थेट मनपा मुख्यालय गाठून उपायुक्तांची भेट घेतली. दोन्ही अधिकाNयांमध्ये झालेल्या चर्चेनंतर चार दिवसांत थकबाकी भरण्याचा निर्णय झाला, अशी माहिती वॉर्ड अधिकारी भालचंद्र पैठणे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या