कोरेगाव पार्कमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; 4 परदेशी तरुणींसह सातजणींची सुटका

कोरेगाव पार्कमधील द सिग्नेचर थाई स्पा येथे मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने 7 पीडित तरुणीची सुटका केली. यामध्ये 4 परदेशी तरुणींचा समावेश आहे. याप्रकरणी दोघांवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून स्पा मॅनेजरला अटक करण्यात आले आहे. उत्तम शेषराव सोनकांबळे (38, रा. खराडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, स्पा चालक गजानन दत्तात्रय आडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरेगाव पार्क भागातील साऊथ मेन रस्त्यावरील एका सोसायटीत द सिग्नेचर थाई स्पा या मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता. मसाज सेंटरमध्ये परदेशी महिला असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून शहानिशा केली आणि मसाज सेंटरवर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी येथून थायलंडमधील चार महिलांसह सात जणींना ताब्यात घेतले. तर, मसाज सेंटरचा व्यवस्थापक सोनकांबळेला अटक करण्यात आली आहे. त्याला यांना कोरेगाव पार्क पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, मनीषा पुकाळे, तुषार भिवरकर, रेश्मा कंक आदींनी ही कारवाई केली.