प्रथिनांचे महत्त्व

91

संग्राम चौगुले

जेवणाव्यतिरिक्त आपण जे अन्न घेतो त्याला प्रोटीन सप्लीमेंट असे म्हणतात. ते द्रव किंवा पदार्थांच्या स्वरुपातही असू शकते. माणसाला प्रथिनांची गरज जेवढी असते ती नेहमीच्या खाण्यातून पूर्ण होत नसेल तर जास्तीची प्रथिने घ्यावी लागतात. जिमला जाणाऱयांसाठी प्रोटीन सप्लीमेंट घेणं गरजेचं आहे. कारण शरीराच्या वाढीसाठी प्रथिनांची आवश्यकता असते. काही ठरावीक पदार्थांमधून ते शरीराला मिळतात. एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीने वजनवाढीसाठी दररोज थोडे तरी प्रोटीन सप्लीमेंट घेतले पाहिजे. ती व्यक्ती जर खेळाडू असेल तर त्या मानाने जास्त प्रोटीन सप्लीमेंट घ्यावे लागेल हे लक्षात ठेवायचे. दररोजच्या जेवणातून शरीराच्या योग्य वाढीसाठी पुरेशी प्रथिने मिळत नाहीत. मग ती पावडर, बार वगैरेंच्या रुपात वेगळे घ्यावे लागते. प्रत्येकाच्या शरीराच्या मानाने त्याने प्रोटीन सप्लीमेंट किती घ्यायला पाहिजे ते जिममध्ये प्रशिक्षक व्यवस्थित सांगू शकतो.

प्रोटीन सप्लीमेंटची माणसाला गरज असते. कारण शरीरातील स्नायू बनविण्यासाठी जेवढय़ा प्रथिनांची गरज असते तेवढी प्रथिने जेवणातून मिळत नाहीत. अंडी, चिकन, मासे, मटन हे आपल्या रोजच्या जेवणात नसते. त्यामुळे स्नायूंचा विकास होत नाही. आपण ते दररोज खाऊही शकत नाही. कारण आपल्याला ते पचणारच नाही. त्यामुळे दररोज आपल्याला किती प्रोटीनची गरज भासते याचा अंदाज घेऊन त्यापैकी काही प्रमाणात प्रोटीन्स अन्नातून तर काही प्रोटीन्स सप्लीमेंट्समधून मिळवावी लागतात. सर्वसाधारण लोकांना सप्लीमेंट्सची जास्त गरज लागत नाही. कारण त्यांचे मुख्य ध्येय स्नायू बळकट करणे नसते. त्यामुळे त्यांनी दिवसभरातून एकदा जरी प्रोटीन सप्लीमेंट घेतली तरी पुरेसे आहे.

आधी प्रोटीन सप्लीमेंट बाहेरून आयात करावी लागत होती. पण आता हिंदुस्थानातही त्यांचे उत्पादन सुरू झाले आहे. त्यामुळे आपल्याला सर्वच सप्लीमेंट्स आयात करावी लागत नाही. प्रथिने घेतल्यामुळे कमजोर मांसपेशींमध्ये बळ येते. त्यामुळे वेटलिफ्टिंग, बॉडीबिल्डींग करणाऱयांनी प्रोटीन सप्लीमेंट घेतलेच पाहिजे. त्यांना अन्य पोषक अन्नाबरोबरच जादा प्रथिने घेणं फायद्याचं ठरेल. जखमी खेळाडूंसाठीही प्रोटीन सप्लीमेंट महत्त्वाचे ठरतात.

जरा बेतानेच…!

सप्लीमेंट्स ही उणीव भरून काढण्यासाठी असतात. त्यामुळे ती सप्लीमेंट म्हणूनच घ्यायची असतात. आपल्याला आवश्यकता असलेली प्रथिनांची ८० टक्के गरज ही आपल्या जेवणातून म्हणजे चिकन, अंडी, फिश, मटन आणि दुधाचे पदार्थांतून पूर्ण होते. राहिलेली २० टक्के प्रथिने सप्लीमेंटच्या माध्यमातून घ्यायची. कोणत्याही पदार्थाचा अतिरेक वाईटच… त्यामुळे शरीराला प्रोटीन सप्लीमेंटची कितीही गरज असली तरी ती जास्त घेणे चुकीचेच. कारण प्रथिनांची ही सप्लीमेंट्स जादा घेतली तर अपचन होऊ शकते. शिवाय गरजेपेक्षा जास्त प्रथिने घेतली तर लठ्ठपणाही येऊ शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या