मतं विकत घेणाऱ्या भाजपच्या आजी-माजी आमदारांना तुरुंगवासाची शिक्षा

27

सामना ऑनलाईन, अहमदाबाद

गुजरातमध्ये कशीबशी सत्ता राखण्यात यशस्वी झालेल्या भाजपला एक मोठा हादरा बसला आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष निंबेन आचार्य, एक माजी आमदार आणि अन्य एका आरोपीला आचारसंहितेच्या उल्लंघनाबद्दल एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निवडणुकींमध्ये मतदारांना पैशांचं आमीष दाखवत त्यांची मतं मिळवल्याचा आरोप या भाजप नेत्यांवर करण्यात आला होता. २००९ साली झालेल्या निवडणुकीमध्ये हा गैरप्रकार झाल्याचं उघडकीस आलं होतं, ज्यामुळे निवडणूक आयोगाने या तिघांविरोधात खटला दाखल केला होता.

निंबेन आचार्य हे भाजपचे ज्येष्ठ आणि अनुभवी आमदार आहेत. कच्छ जिल्ह्यातील भुजमधून ते नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आमदार म्हणून पुन्हा निवडून आलेले आहेत. या खटल्यात दोषी सिद्ध झालेले भाजपचे माजी आमदार कांती अमृतिया हे मोरबी विधानसभा क्षेत्रातून २००९ साली निवडणूक लढवत होते. त्यांच्या प्रचारासाठी आचार्य आणि पाटीदार अनामत आंदोलनाचे नेते मनोज पानारा हे या मतदारसंघात फिरले होते. या तिघांनी मिळून मतदारांना पैशाचे प्रलोभन दाखवून मत आपल्या पदरात पाडून घेतली असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

निवडणूक आयोगाला माहिती मिळाली होती की भाजपचे हे तीन नेते त्यांच्या कार्यकर्त्यांना ठराविक मतं मिळाल्यास तुम्हा बक्षिस देण्यात येईल असं प्रलोभन दाखवत आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर मोरबीचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी यांनी या नेत्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी जिग्नेश दामोदरा यांच्यापुढे सुनावणीसाठी आलं होतं. साक्षीपुरावे तपासल्यानंतर या तीन नेत्यांविरूद्ध लावण्यात आलेले आरोप खरे असल्याच्या निष्कर्षापर्यंत न्यायाधीश पोहोचले,त्यामुळे त्यांनी या तिघांना एक वर्षाचा तुरूंगवास आणि प्रत्येकी २ हजार दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या