मंत्र्याविरोधातील विरोधप्रदर्शने ही कुराणविरोधी! कम्युनिस्ट पक्षाने केला स्वपक्षीय नेत्याचा बचाव

केरळातील सोने तस्करीचे प्रकरण दिवसेंदिवस गंभीर बनत चालले आहे. या प्रकरणाची राष्ट्रीय सुरक्षा संस्था (NIA) आणि अंमलबजावणी संचलनालय (ED) या दोन यंत्रणा तपास करत आहे. केरळमधले उच्च शिक्षणमंत्री के.टी.जलील हे या यंत्रणांच्या रडारवर आले असून त्यांची चौकशी सध्या सुरू आहे. चौकशीदरम्यान त्यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. नियमांना धाब्यावर बसवून आपण संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) वाणिज्यिक दूतावासाकडून आलेल्या कुराणच्या प्रती आपणच घेतल्याचे जलील यांनी मान्य केले आहे. या प्रतींशिवाय सीमाशुल्क कायद्याचे उल्लंघन करून जलील यांनी खाण्या-पिण्याची पाकिटं स्वीकारली होती आणि ती एका खासगी धार्मिक संस्थेत वाटण्याच्या नावाखाली पोहचवण्यात आली होती असा जलील यांच्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. याही प्रकरणाची तपास यंत्रणा चौकशी करत आहेत.

खाण्या-पिण्याची पाकिटे धार्मिक संस्थेत पोहचवली

जलील यांनी ही पाकिटे मलप्पुरम इथल्या धार्मिक संस्थेत पोहचवली असून ती जलील यांच्या हस्ते वाटण्यात येणार होती असा आरोप त्यांच्यावर आहे. ही पाकिटं या संस्थेपर्यंत आणण्यासाठी सरकारी वाहनाचा वापर करण्यात आला होता ही आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आणखी एक धक्कादायक बाब ही उघडकीस आली आहे की ज्या संस्थेत ही पाकिटं पोहचवण्यात आली आहे, त्या संस्थेने या अन्नधान्याच्या पाकिटांची मागणीच केली नव्हती. तपास यंत्रणांना संशय आहे की या पाकिटांमध्ये अंमली पदार्थांसारख्या प्रतिबंधित गोष्टी दडवलेल्या असण्याची शक्यता आहे. सोने तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेली स्वप्ना सुरेश हिचे या व्यवहाराशी संबंध असल्याने तपास यंत्रणा या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत.

विरोधकांकडून जलील यांच्या राजीनाम्याची मागणी

जलील यांच्यावरील या गंभीर स्वरुपाच्या आरोपांनंतर केरळमध्ये विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस, काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या संयुक्त मुस्लिम लीग यांनी आंदोलने करत जाब विचारायला सुरुवात केली आहे. त्यांच्या या आंदोलनांवर कम्युनिस्ट पक्षा(मार्क्सवादी)चे राज्य सचिव बाळकृष्ण यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यांच्या पक्षाच्या दैनिकामध्ये त्यांनी लिहिलेल्या लेखामध्ये ही विरोध प्रदर्शने कुराणविरोधी असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुराणविरोधी आंदोलनात संयुक्त मुस्लिम लीग ही तेल ओतण्याचे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कुराणसारख्या धार्मिक पुस्तकाची थट्टा केली जाता कामा नये आणि म्हणून आम्ही याला विरोध करत असल्याचं बाळकृष्ण यांचं म्हणणं आहे. त्यांनी जलील यांच्या राजीनाम्याची मागणीही अयोग्य असल्याचं म्हटलं आहे.

कम्युनिस्ट पक्ष प्रकरणाला धार्मिक रंग देत असल्याचा आरोप

बाळकृष्ण यांच्या विधानांबाबत बोलताना विरोधकांनी केरळमधले सरकार या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी म्हटलंय की सरकारची या प्रकरणामध्ये लाज गेली आहे. कुराणाचा अशा पद्धतीने वापर करून राजकारण करणे हे अत्यंत घातक आहे असे त्यांचे म्हणणे आहे. संयुक्त मुस्लिम लीगचे महासचिव पी.के.कुन्हालकुट्टी यांनी म्हटलंय की कम्युनिस्ट पक्ष आणि जलील यांनी त्यांच्यावरील सोने तस्करीच्या आरोपांना उत्तर द्यावेतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी कम्युनिस्ट पक्ष हा जलील यांना धार्मिक प्रतिकाच्या स्वरुपात सादर करण्याचा प्रयत्न करत त्यांचा बचाव करत असल्याचं म्हटलं आहे.

स्वप्ना सुरेश नावाची महिला केरळमधल्या सोने तस्करीची मास्टर माईंड असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. तिला अटक करण्यात आली असून स्वप्नाचे केरळमधल्या सत्ताधारी पक्षातील अनेक मंत्री आणि अधिकाऱ्यांची जवळचे लागेबांधे असल्याचा संशय आहे. या जवळच्या संबंधांमुळे ती सोनं तस्करी करू शकत होती आणि या सोने तस्करीतून मिळणारा पैसा हा दहशतवादाला पोसण्यासाठी वापरण्यात येत होता असा आरोप केला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या