कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येचा निषेध म्हणून देशभरात एनडीए सरकारविरोधातील रोष वाढत असून डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ठोस कायदा तयार करण्याची मागणी होत आहे. आंदोलन दिवसेंदिवस पेटतच चालले आहे. आज पश्चिम बंग छात्र समाजाच्या विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत भव्य मोर्चा काढला. कोलकाता कॉलेज स्क्वेअर येथून राज्य सचिवालय नबान्नाच्या दिशेने सरकारविरोधात घोषणाबाजी करत हा मोर्चा निघाला. विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली तसेच बॅरीकेड्स तोडले. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांवर पाण्याचा मारा केला. तसेच अश्रुधुराच्या नळकांडय़ांचा वापर करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला.
नबन्ना हे पश्चिम बंगाल सरकारचे सचिवालय असून या ठिकाणी मुख्यमंत्री, मंत्री आणि अधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. दुपारी पावणे एकच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. आंदोलकांनी हावडाला लागून असलेल्या संत्रागाछीमध्ये बॅरीकेड्स तोडले. पोलिसांनी हिंसाचाराचा दाखला देत आंदोलकांचा मोर्चा बेकायदेशीर असल्याचा दावा केला. जमावाला पांगवण्यासाठी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक आंदोलक जखमी झाले. दरम्यान मार्च टू नबन्ना मोर्चासाठी कोणतीही परवानगी दिली नव्हती, असा दावा पोलिसांनी केला असून मोर्चा दरम्यान हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा तृणमूल काँग्रेसने केला होता.
हावडा ब्रीज बंद; पोलीस बंदोबस्त वाढवला
आंदोलकांना नबन्ना येथील सचिवालयापर्यंत जाण्यापासून रोखण्यासाठी 7 रस्त्यांवर तीन थरांमध्ये 6 हजारांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. 19 ठिकाणी बॅरिकेडिंग तर 21 ठिकाणी डीसीपी तैनात करण्यात आले. हावडा ब्रीज पूर्णपणे बंद करण्यात आला तसेच येथील बारीकसारीक घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची मदत घेण्यात येत आहे.
कोलकाता बलात्कार आणि हत्येप्रकरणी सीबीआय डीएनएशी निगडित पुराव्यांप्रकरणी एम्स अर्थात ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स आणि फॉरेन्सिक अहवालाची मदत घेणार आहे.
भाजपचा आज ‘पश्चिम बंगाल बंद’
कोलकाता बलात्कार आणि हत्येचा निशेष म्हणून भारतीय जनता पार्टीने बुधवारी 12 तासांसाठी ‘पश्चिम बंगाल बंद’ची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलना दरम्यान हिंसा भडकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी भाजपाने केली आहे.
तिरुपती येथे महिला डॉक्टरवर हल्ला
तिरुपती येथील व्यंकटेश्वरा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयात एका रुग्णाने अचानक एका महिला डॉक्टरवर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे रुग्णालयातील इतर रुग्ण प्रचंड घाबरले. या हल्ल्यानंतर रुग्णालयातील अलार्म वाजल्यामुळे वॉर्डातील इतर डॉक्टर आणि सहकारी मदतीला धावले आणि हल्लेखोर रुग्णाला पकडले. या घटनेनंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी सुरक्षेची मागणी केली. दरम्यान, हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली.