मुख्यमंत्री व सरकार विरोधात भाजप आमदार रस्त्यावर, जोरदार नारेबाजी

65

सामना प्रतिनिधी । नागपूर

सतत दोन दिवस झालेल्या गारपीटीमुळे राज्यातील शेतकरी हादरला आहे. गारपीटीचा जोरदार फटका बसल्याने संत्रा, गहू, हरभरा या पिकांचे अतोनात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यानं सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत भाजपचे काटोलटे आमदार आशिष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारविरोधोत जोरदार घोषणाबाजी केली. तसंच टायर पेटवून नागपूर-अमरावती महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला ७ किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शेतकऱ्याच्या आंदोलनाचे लोण वर्धा जिल्ह्यातही पसरले त्यामुळे मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यत महामार्गावरील वाहतूक ठप्प होती.

कोढाळी भागात सोमवारी बोरा एवढ्या आकाराच्या गारा पडल्या. यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. मंगळवारी नुकसानीची पाहणी केल्यानंतर खापरी (बरोकर)फाट्यावर नागपूर-अमरावती महामार्गावर शेतकऱ्यांनी काटोलचे आमदार डॉआशिष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन सुरू केले. यावेळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानीची पाहण केलीच पाहिजे असे म्हणत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल एक तासाने वाहतूक सुरळीत झाली.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या चक्का जाम आंदोलनाचे लोण खापरी पासून ४ किलोमीटर अंतरावरील वर्धा जिल्हातील हेट्टीकुंडी फाटा येथेही पोहोचले. येथे शेतकरीनी चक्का जाम आंदोलन सुरू केल्याने दुपारी २ पर्यत वाहतुक बंद होती व जवळपास 20 कि.मी पर्यत वाहनांच्या रंगा लागल्या होत्या. शेतक-यांच्या या अचानक झालेल्या आंदोलनाचा फटका हजारो प्रवाशी व वाहन चालकांना बसला.

आपली प्रतिक्रिया द्या