ठाण्यात ‘पद्मावती’ चित्रपटाचा निषेध

47

सामना ऑनलाईन । ठाणे

हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटामुळे सुरू झालेला वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाही. संजय लीला भन्साळीच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाला ठाण्यात निषेध करण्यात आला आहे. राजपूत समाज, हिंदू संघटनेतून या चित्रपटाला विरोध करण्यात येत आहे. चित्रपटाविरोधात राजपूत पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. भन्साळीला वारंवार इशारा देऊनही तो सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चुकीचा इतिहास दाखवत असल्याचा या संघटनांचा आरोप आहे.

राजपूत राणी पद्मावती ही वीर योद्धा होती. खिलजीच्या हाती लागण्यापेक्षा आपली अब्रू वाचवण्यासाठी राणी पद्मावतीने सोळा हजार महिलांसह अग्निसमर्पण (जोहार) केले. असे कर्तृत्व असताना या महान राणीचे आणि अल्लाउद्दीन खिलजीचे प्रेमसंबंध दाखवणे म्हणजे राणीच्या शौर्याचा आणि त्यागाचा अपमान असल्याचे संघटनेकडून बोलले जात आहे.

चित्तौड़ची राणी असलेल्या पद्मावतीची गोष्ट चित्रपटातून सांगण्यात आली आहे. चित्रपटात दाखवलेले प्रेमसंबंध प्रत्यक्षात नव्हतेच अशी भूमिका घेत राजपूत संघटनांनी पद्मावती चित्रपटाला विरोध केला आहे. ‘पद्मावती’ या चित्रपटात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी इतिहासाशी छेडछाड केल्याचा संघटनेचा आरोप आहे. येत्या १ डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याआधी जानेवारी महिन्यात करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पद्मावतीच्या सेटवर जाऊन धुडगूस घातला होता. चित्रपटाला विरोध म्हणून चित्तौड़गड येथे बंद देखील पाळण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या