शेतकरी अद्याप पीकविम्याच्या प्रतिक्षेत, शिवसेनेचे आंदोलन

>>प्रसाद नायगावकर

यवतमाळ : पूरपरिस्थितीने पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना हमखास नुकसान भरपाई मिळेल, असे आश्वासन विमा कंपनीने दिले. प्रत्यक्षात विमा उतरविण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने कोट्यवधीची रक्कम विमा कंपनीकडे जमा केली.यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान झाल्यावर केवळ 3 रुपये, 10 रुपये, अडीचशे रुपये, व अकराशे रुपये अशा स्वरूपाची मदतीची रक्कम झाली. तर नुकसान न झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात मात्र लाखो रुपये वळते झाले . यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून आंदोलन केले.

पीक विमा कंपनीने दिवाळीपूर्वी 59 हजार शेतकऱ्यांच्या नावावर 41 कोटी रुपयाची विमा रक्कम जमा झाल्याची घोषणा जिल्हा प्रशासनाने केली होती . शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाला नाही. अशीच एकूण स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शिवसैनिकांनी ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) कृषी अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. यावेळी कृषी अधीक्षक कार्यालयाला शेतकऱ्यांच्या नावाची यादी मागण्यात आली.

यावेळी जाहीर झालेल्या यादीतील नावे आणि शेतकऱ्यांच्या मदतीची रक्कम बघून प्रत्येकाला धक्का बसला. शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी लाखोंची हमी देणाऱ्या विमा कंपनीने शेतकऱ्यांचा घात केल्याची बाब यावेळी पुढे आली. यवतमाळ तालुक्यातील कोळंबी, अकोला बाजार, हिवरी या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन रुपये, तीन रुपये, नऊ रुपये, अडीचशे रुपये, तेराशे रुपये अश्या प्रकारची मदतीची रक्कम जमा झाली . यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला . यावेळी संतप्त शिवसैनिकांनी ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड आणि तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी यांच्या खुर्चीला हार घातला . हे अधिकारी बहुतांश वेळा हजर नसतात आणि वारंवार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे डोळेझाक करतात असा आरोप शेतकऱ्यांनी केला .

या यादीत ऊस उत्पादक शेतकऱ्याला एक लाख रुपयाची मदत मिळाली आहे, तर ज्या शेतकऱ्यांच्या शेतशिवारचे नुकसान झाले नाही त्यांना भरघोस मदत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात काही रुपयाचा निधी आला आहे. या गलथान कारभाराला अधिकारी आणि विमा कंपनी जबाबदार असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.

यावेळी कृषी अधिकाऱ्यांच्या कक्षात सरकार विरोधात नारेबाजी करण्यात आली. या आंदोलनात शिवसेना संघटनेचे जिल्हाप्रमुख संतोष ढवळे, बाजार समितीचे उपसभापत किशोर इंगळे, संजय रंगे, संतोष गदई विनोद पवार, श्रीकांत माकोडे, दत्त सूर्यवंशी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.